सांगली : लहान मुलीला अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी यशवंतनगर येथील बाबूराव मरीबा रणदिवे (वय ३५) याला १६ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
याबाबतची माहिती अशी की, पिडीत मुलगी ही १० मार्च २०२० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास अंगणात खेळत होती. त्यानंतर ती नातेवाईकांकडे टीव्ही पाण्यासाठी जात होती. या रस्त्यावर दुचाकी लावून आरोपी रणदिवे बसला होता. मुलीला पाहून त्याने अश्लिल शिवी दिली. त्यामुळे मुलगी रडतच घरी आली. तिने आईला सगळी हकिकत सांगितली. पिडीत मुलीची आई व आजी जाब विचारण्यासाठी आल्या असता आरोपीने पळ काढला. मुलीच्या आईने संजयनगर पोलिसांत आरोपीविरूद्ध तक्रार दाखल केली.
न्यायाधीश हातरोटे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. यात सात साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत मुलीचाही जबाब न्यायालयात घेण्यात आला. न्यायालयाने आरोपी रणदिवे याला विविध कलमाखाली १६ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे ॲड. कविता चव्हाण व आरती देशपांडे यांनी काम पाहिले. या खटल्यात पोलिस हवालदार रमा डांगे, वंदना पवार, सहाय्यक फौजदार शरद राडे, पोलिस नाईक बाबासाहेब काटकर यांनी मदत केली.