मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांचा तपास सुरु आहे, आतापर्यंत अनेक कलाकार आणि निर्मात्यांचे मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका होऊ लागली, चाहत्यांनी यावरुन करण जोहर, सलमान खान यांना लक्ष्य केले होते.
यातच अभिनेत्री कंगना रणौत हिनेही या प्रकरणात सातत्याने आवाज उचलला आहे. याबाबत कंगना रणौतने आता ट्विट करुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. नेमकं आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणात कसं आलं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, पण कंगना रणौतच्या डिजिटल टीमनं याबाबत ट्विट केले आहे. त्यात म्हटलं आहे की, करण जोहर यांच्या मॅनेजरला समन्स पाठवण्यात आलं, पण करण जोहर यांना नाही कारण ते आदित्य ठाकरे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा जवळचा मित्र आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुशांत सिंग राजपूतच्या हत्येची चेष्टा थांबवावी असा टीका कंगना रणौतने केली आहे.
याच ट्विटला जोडून कंगनानं आणखी एक ट्विट केलं आहे. कंगना रणौतच्या मॅनेजरला समन्स बजावण्यात आलं नाही, तिथे मात्र थेट कंगनाला समन्स बजावलं, मग करण जोहरच्या मॅनेजरला समन्स बजावण्यात आलं, मुंबई पोलिसांनी नेपोटिझम थांबवावा, करण जोहरला समन्स नाही कारण साहब को परेशानी ना हो इसलिये? असा आरोप तिने लावला आहे. त्यामुळे कंगनाच्या आरोपांमुळे नवा राजकीय वादही निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुशांत सिंग राजपूत प्रकरणात दिग्दर्शक आणि निर्माता महेश भट्ट यांना वांद्रे पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. महेश भट्ट यांना मुंबई पोलिसांनी पोलीस ठाण्यात हजर राहायला सांगितले होते. त्यांचा जबाब सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये सुमारे दोन तास नोंदविण्यात आला. येथे या प्रकरणातील तपास अधिकारी व इतर पथक त्यांच्यासमवेत उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता महेश भट्ट हे पोलीस ठाण्यातून आपल्या घराकडे परतले आहेत.