बरेली – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनं अनेकांना मोठा धक्का बसला, गेल्या अनेक महिन्यांपासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता असं त्याच्या मित्रांकडून सांगण्यात येत आहे. सुशांत राजपूतने हे टोकाचं पाऊल का उचललं हाच प्रश्न लोकांच्या मनात आहे. अशात उत्तर प्रदेशातील बरेली इथे एका दहावीच्या मुलानं सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची बातमी पाहून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे.
बरेली आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, जर अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या करु शकतो तर मी का नाही, दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहून पंख्याला लटकून गळफास घेतला. सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की, त्याच्यात किन्नरासारखी लक्षण आहेत. त्याचा चेहराही मुलींसारखा दिसतो. त्यामुळे लोक त्याची खिल्ली उडवतात. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले आणि चौकशी सुरु केली.
आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे वडील मोबाईल दुरुस्तीचं काम करतात. मुलाच्या आईचं याआधी निधन झाले आहे. विद्यार्थ्याने मरण्यापूर्वी त्याचा चेहरा मुलींसारख दिसतो. लोक अनेकदा त्यावरुन मस्करी करतात, त्यामुळे आता मलाही स्वत:वर संशय येऊ लागला आहे. माझ्याकडे सध्या आत्महत्या करण्याशिवाय काहीच मार्ग नाही. मी जर आत्महत्या केली नाही तर माझ्या वडिलांना लोकांचे टोमणे ऐकावे लागतील. मी किन्नर असल्याचं समजताच लोक वडिलांचीही मस्करी करतील. त्यासाठी माझं मरणे गरजेचे आहे असं त्या विद्यार्थ्याने लिहिलं आहे.
तसेच मी गाणी गातो, मला लहान मुलांना कला शिकवण्याची इच्छा होती असंही सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. मुलाची सुसाईड नोट वाचून वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. माझा मुलगा चित्र खूप चांगले काढत होता. त्याच्या शाळेतील शिक्षिकाही त्याचं कौतुक करत असे. तसेच या सुसाईड नोटमध्ये मुलाने माझ्या अंत्यसंस्काराला अशा लोकांना बोलावू नका जे माझा तिरस्कार करतात. विद्यार्थ्याने त्याच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलं नाही.
मृतकाच्या छोट्या भावाने पोलिसांना सांगितले की, ज्यावेळी आम्ही दोघं टीव्ही बघत होतो त्यावेळी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची बातमी आली. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला की, सुशांत सिंगप्रमाणे आपल्या दोघांनाही असं फासावर लटकायला हवं. जेव्हा इतका मोठा स्टार आत्महत्या करु शकतो तर आपण का नाही करु शकत असं त्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यापूर्वी सांगितलं होतं.