मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) याचे नाव #मी टू मोहिमेत विनाकारण गोवले गेले होते. त्यामुळे तो तणावात होता, अशी माहिती मुंबई पोलिसांना त्याची ‘दिल बेचारा’ या चित्रपटातील सहकलाकार संजना सांघी हिने दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाºयाला तो ओळखत होता असेही ती म्हणाली.
सुशांतने चित्रीकरणादरम्यान संजनासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. २०१८ मध्ये #मीटूमार्फत त्याचे नाव घेऊन त्याला ट्रोल केले गेले. संजनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, असे काही झाले नव्हते. ती अफवा होती. तिचे आणि सुशांतचे नाव घेतले तेव्हा ती चित्रपटाच्या कामानिमित्त तिच्या आईसोबत परदेशात होती. ती परत आली तेव्हा तिने असा काही प्रकार घडला नसल्याचे सोशल मीडियावर शेअरही केले होते. तसेच सुशांत आणि तिच्यात या विषयावरून झालेल्या संभाषणाचे ‘स्क्रीन शॉट्स’देखील शेअर केले होते.
त्याची बदनामी कोण करत आहे, याबाबत त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे तो काही काळ तणावात होता. मात्र ती व्यक्ती कोण आहे याची वाच्यता त्याने कधीच केली नाही, तो स्वत:मध्येच असायचा, अशी माहिती संजनाने पोलिसांना दिल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.त्यामुळे #मीटूमध्ये त्याचे नाव गोवणारी ती व्यक्ती कोण, याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. तर सुशांतच्या चाहत्यांकडून त्याच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे.