मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सुशांतही आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा विरोधकांनी केला होता. याबाबत बिहार पोलीस अधिकारी मुंबईत तपासासाठी आले असता त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं. या प्रकरणात कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांकडून केला जात आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकारवर लावला होता.
आता या प्रकरणी टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने सुशांतचे कॉल रेकॉर्डस समोर आणले आहेत. यात सुशांतचं घर सोडल्यानंतर रिया चक्रवर्ती आणि सुशांत यांच्यात कोणतंही संभाषण झालं नसल्याचं दिसून येते. ८ ते १४ जून या काळात सुशांतचे त्याच्या बहिणींसोबत अनेकदा फोनवरुन चर्चा झाल्याचं आढळून आलं आहे. सुशांत सिंग राजपूतचे वकील विकास सिंह यांनी मुलाखतीत म्हटलं की, सुशांतच्या घरातून गेल्यानंतर रियाने सुशांतचा कॉल ब्लॉक केला होता. रिया आणि सुशांतमध्ये ८ ते १४ जूनदरम्यान काहीही संवाद झाला नाही. रियानेही सुशांतला फोन केला नाही तर सुशांतने तिला फोन केला नाही.
रियाने जानेवारी महिन्यात १ दिवसात सुशांतला १९ वेळा कॉल लावल्याचं सांगितलं जात होतं. पण मृत्यूपूर्वी सुशांतच्या कॉल रेकॉर्डनुसार रियाचं त्याच्यासोबत काहीही बोलणं झालं नाही. सुशांतची बहिण राणी हिने सुशांतला ८ ते १४ जूनमध्ये एकाद कॉल केला होता. त्यानंतर सुशांतने बहिण राणीला एकदा कॉल केला होता. टॅलेंट मेनेजरने सुशांतला ५ वेळा कॉल केला होता. या काळात रियाने सुशांतला कॉल केला नाही. तर सुशांतची दुसरी बहिण मीतू हिने एकदा त्याला कॉल केला होता.
दरम्यान, बिहार सरकारच्या शिफारसीवरुन केंद्राने बुधवारी सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील तपास सीबीआय चौकशी करण्यास परवानगी दिली आहे. एका रिपोर्टनुसार याप्रकरणी सीबीआय बिहार पोलिसांनी नोंदवलेली एफआयआर पुन्हा नोंदवू शकते ज्यात फसवणूक, विश्वासघात आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे यासारख्या गोष्टींचा उल्लेख आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी पाटणा येथे रिया चक्रवर्ती विरूद्ध एफआयआर दाखल केली आहे ज्यामध्ये त्याने अभिनेत्रीवर मुलाचा पैसा हडपण्याचा आणि कुटुंबीयांपासून दूर करुन आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.