नवी दिल्ली – सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्ती आणि ५ जणांच्या विरोधात आत्महत्येता प्रवृत्त करणे, गुन्हेगारी षडयंत्र रचणे, चोरी-फसवणूक आणि धमकी यासारखे गुन्हे नोंदवण्यात आले आहे. यापूर्वी सुशांत सिंगच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पटना येथे रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीबीआयने बिहार पोलिसांशी संपर्क साधून आतापर्यंतच्या तपासाची कागदपत्रे मागितली आहेत. सीबीआयचं विशेष पथक सुशांतच्या मृत्यूची चौकशी करणार आहे. यात डीआयजी मनोज शशिधर आणि एसपी नुपूर प्रसाद यांचा सहभाग असेल. बिहार पोलिसांनी २५ जुलै रोजी आयपीसी कलम ३४१, ३४८, ३८०, ४०६, ५०६, ४२०,१२०ब अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. सीबीआयच्या एफआयआरमध्ये हेच कलम लावण्यात आले आहे.
सीबीआयने या प्रकरणात ज्यांना आरोपी बनवले आहे त्यात रिया चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सैमुएल मिरांडा, श्रुती मोदी यांचा समावेश आहे. अलीकडेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सुशांतच्या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या शोधात ईडीला महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.
ईडीच्या सूत्रांनुसार सुशांत सिंग राजपूतच्या ४ बँक खात्याची माहिती मिळाली आहे. ज्यातील २ बँक खात्यातून रिया चक्रवर्ती हिला पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाच्या नावावर मुंबईतील प्राईम लोकेशनवर २ संपत्ती आहे. ईडीने या संपत्तीची कागदपत्रेही तपासणीसाठी मागितली आहेत.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी प्रोटेक्टिव्ह ऑर्डरची याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे बिहार पोलिसांचे पथक रियाची चौकशी करू शकते. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीसह ५ जणांविरोधात पाटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनी आपल्या तक्रारीत आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासोबत अनेक गंभीर आरोप केले. रियाने पैशांसाठी सुशांतला फसवल्याचंही त्यांनी यात म्हटलं आहे. बिहार सरकारच्या शिफारसीनंतर केंद्राने सीबीआयकडे वर्ग केले आहे.