मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष पथकाने सुशांतचे लेखा परीक्षक (सीए) संदीप श्रीधर आणि त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानीची मंगळवारी पुन्हा चौकशी केली. तसेच सुशांतच्या परिचयातील तिघांची सुमारे सहा तास स्वतंत्रपणे चौकशी केली. ईडीकडून मिळालेले दस्तावेज, बँक अकाउंटचे डिटेल्स, आर्थिक व्यवहार, खर्च, गुंतवणूक, आयटीआरबद्दल तपशील त्यांनी सीएकडून माहिती करून घेतल्याचे समजते.
सीबीआयने आता लक्ष याचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीकडे वळवले आहे. वांद्रे पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी निरीक्षक भूषण बेळणकर व उपनिरीक्षक वैभव जगताप यांना चौकशीसाठी समन्स बजावले. सीबीआयने पाच टीम तयार केल्या आहेत. १४ जूनपासून तपास करणारे वांद्रे पोलीस ठाण्याचे अधिकारी बेळणकर, उपनिरीक्षक जगताप यांच्याकडे दोन महिन्यांतील तपास, एफआयआर न घेता केवळ सीआरपीअंतर्गत चौकशी करणे, ५६ जणांचे नोंदलेले जबाब आदींबाबत चौकशी केली जाईल....तर त्रिमुखेंचीही चौकशीवांद्रे पोलीस ठाण्यातील दोघा तपास अधिकाऱ्यांच्या चौकशीत समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता त्या परिमंडळ - ८ चे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांचीही सीबीआय चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.