जमीर काझी मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूबद्दल देशपातळीवर उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र, त्याचा विश्वासू नोकर नीरज सिंग हा मात्र त्याने आत्महत्याच केली, यावर ठाम आहे. चार, पाच महिन्यांपासून आजारी असल्याने सरांनी हे कृत्य केले असावे, असा जबाब त्याने सीबीआयच्या विशेष पथकाला दिला.
नीरजने जबाबात म्हटले आहे की, एप्रिल, २०१९ पासून तो सुशांतकडे हाउस कीपिंगमध्ये कामाला होता. सर व रिया चक्रवर्ती या आॅक्टोबर, २०१९मध्ये युरोपला गेले होते. तेथून परतल्यावर ते आपल्या घरी न राहता मॅमसोबत राहत होते. तिथेच दिवाळी साजरी केली आणि दहा ते पंधरा दिवसांसाठी केप्री हाइट्समध्ये आले. त्यावेळेस ते अशक्त दिसत होते. डिसेंबर, २०१९मध्ये सरांनी माउंटब्लँकमध्ये एक घर भाड्याने घेतले. त्या घराची साफसफाई करण्यासाठी मला बोलाविल्यावर मी सरांना भेटलो, तेव्हा ते खूपच आजारी, थकल्यासारखे वाटत होते. रिया मॅम सुशांत सरांसोबत लॉकडाऊनमध्ये राहण्यासाठी आल्या. त्या सतत सरांसोबत असत. मध्ये फक्त एक किंवा दोन दिवसांसाठी त्यांच्या आई-वडिलांकडे जात होत्या किंवा त्यांचे आई-वडील माउंटब्लँकमध्ये येत होते.
८ जूनला जेवणाची तयारी करत असताना, मला मॅमने बोलावून त्यांच्या कपाटातील कपडे बॅगमध्ये भरण्यास सांगितले आणि त्या त्यांचा भाऊ शोविकबरोबर निघून गेल्या. त्यानंतर, सरांची बहीण मितू सिंग आल्या. आणि १२ जूनला निघून गेल्या. १३ जूनला रात्री सर जेवले नाहीत. त्यांनी फक्त मॅँगो ज्यूस घेतला आणि झोपी गेले. १४ जूनला नेहमीप्रमाणे उठलो आणि सवयीप्रमाणे कुत्र्यांना फिरवून आल्यानंतर ८ वाजता मी वरची रूम साफ केली. त्यानंतर, जिना साफ करत असताना सर रूममधून बाहेर आले. त्यांनी थंड पाणी पिण्यासाठी मागितले. पाणी प्यायल्यानंतर हॉल स्वच्छ आहे का, अशी हसून विचारणा करून ते रूममध्ये निघून गेले. साडेनऊच्या सुमारास सरांनी फक्त ज्यूस आणि नारळपाणी घेतले. साडेदहाच्या सुमारास जेवण काय करायचे, हे विचारण्यासाठी केशव त्यांच्या रूमकडे गेला, तेव्हा रूम आतून लॉक होता. सर झोपले असतील, असे समजून केशव खाली आला आणि त्याने ही बाब खाली बसलेल्या सिद्धार्थ आणि दीपेशला सांगितली. तेव्हा दीपेश आणि सिद्धार्थ सरांची रूम नॉक करू लागले. बराच वेळ नॉक केल्यानंतरही सरांनी दरवाजा उघडला नाही. सिद्धार्थने सरांच्या फोनवर फोन केला. आम्ही रूमची चावी शोधू लागलो, पण आम्हाला चावी मिळाली नाही, म्हणून सिद्धार्थने मितू दीदींना फोन करून सर अर्ध्या तासापासून दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले.
दुपारी दीडच्या सुमारास चावी बनवणारे दोघे आले. चावी बनविण्यास वेळ लागत असल्याने पाच ते दहा मिनिटांत लॉक तोडण्यात आला. त्यानंतर, चावी बनविणाऱ्यांना खाली पाठविण्यात आले आणि दीपेशने त्यांना दोन हजार रुपये दिले. त्यानंतर, दीपेश वर आल्यानंतर सिद्धार्थने रूम उघडली, तेव्हा पूर्ण रूममध्ये काळोख होता आणि एसी सुरू होता. दीपेशने रूमची लाइट चालू केली व सिद्धार्थ हा पुढे गेला. मग दीपेश व मी काय झाले, हे पाहण्यासाठी आत गेलो, तेव्हा सुशांत सर खिडकीकडे तोंड करून पंख्याला गळफास घेऊन बेडच्या बाजूला लटकलेल्या स्थितीत होते....त्यानंतर पोलिसांना केला फोनमी घाबरून रूमच्या बाहेर आलो. सिद्धार्थने मितू दीदींना फोन केला आणि माहिती दिली. सिद्धार्थ यांनी सरांनी गळफास लावलेला कपडा चाकूने कापला. त्यामुळे सुशांत सरांचे पाय बेडच्या खाली आणि कमरेवरील शरीर बेडवर अशा स्थितीत धपकन पडले. मग सिद्धार्थने मदतीसाठी पोलिसांना फोन केला. त्यानंतर, तिथे पोलीस आले, असे नीरजने जबाबत सांगितले.