मुंबई : सुशांतसिंह राजपूत (३४) आत्महत्येप्रकरणी अनेक बड्या हस्तींची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियो की रामलीला’ या चित्रपटातून सुशांतला रिप्लेस करत त्याच्या जागी रणवीर सिंगला मुख्य भूमिका देण्यात आली होती. त्यानुसार या चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साळी यांची पोलीस चौकशी करणार असल्याचे समजते. तसेच बॉलिवूडमधील घराणेशाहीबाबत इन्स्टाग्रामवर व्हिडीओ व्हिडीओ पोस्ट करत निशाणा साधणारी अभिनेत्री कंगना रनौतचाही याप्रकरणी जबाब नोंदविला जाणार असल्याचीही माहिती आहे.
‘रामलीला’ या चित्रपटातून सुशांतला काढण्यासाठी चित्रपट निर्मात्यावर कोणी दबाव टाकला होता का याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ हे चित्रपट सुशांतला मिळणार होते. मात्र त्याआधी सुशांतचे यशराज फिल्म्ससोबत करार झाल्याने त्याला त्या चित्रपटात काम करता आले नाही. परिणामी त्यांच्यातील नात्यात कटुता आली होती. यामागील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
कंगना रनौतने सुशांतच्या मृत्यूनंतर व्हिडीओमार्फत ‘स्मॉल टाऊन बॉय’ सुशांतच्या उत्कृष्ट चित्रपटांचा पुरस्कारासाठी विचार करताना त्याला कशा प्रकारे डावलले गेले, स्टार कीड नसल्याचे किती दुष्परिणाम बॉलिवूडमध्ये भोगावे लागतात, हे रोखठोक सांगितले होते. चौकशी झाल्यास सर्वांची पोलखोल करेन, असेही तिने पत्रकारांना सांगितले होते. त्यामुळे ती पोलीस चौकशीत काय सांगणार, याकडे सर्वांचचे लक्ष लागले आहे.
याप्रकरणी आतापर्यंत ३० जणांची चौकशी करून त्यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. अनेकांना समन्स पाठविले आहेत, ज्यात भन्साळी, कंगना आणि शेखर कपूर यांचाही समावेश असल्याचे समजते. मात्र याबाबत पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे किंवा वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निखिल कापसे यांना विचारले असता त्यांनी कोणतीच अधिकृत माहिती दिली नाही.