अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येशी निगडित ड्रग्ज प्रकरणात ३५वी अटक केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) सर्वात मोठी कारवाई करत सुशांतचा रुममेट आणि महत्त्वाचा संशयित सिद्धार्थ पिठाणी याला हैद्राबादला बेड्या ठोकल्या. एनसीबी मुंबई झोन युनिटचे प्रमुख नेतृत्व करणारे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सोशल मीडिया माध्यम असलेल्या ट्विटरवर कौतुक केले जात आहे.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठाणी हा एक महत्त्वाचा संशयित होता. सिद्धार्थ गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. त्याला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तीन वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं होतं, मात्र एकदाही तो हजर झाला नाही. यामुळे एनसीबीचे अधिकारी त्याच्या मागावर होते.सिद्धार्थ पिठाणी हैद्राबाद येथे लपला होता. त्याला शोधून एनसीबीचे अधीक्षक किरण बाबू यांनी अटक केली. पिठाणी याला आज पाच दिवसांची म्हणजेच १ जूनपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. पिठाणी याच्यावर NDPS कायद्याच्या कलम 28, 29, 27 (a) नुसार कारवाई करण्यात आली आहे.
समीर वानखेड़े महाराष्ट्रातील राहणारे असून ते २००८ बॅचचे भारतीय राजस्व सेवा आयआरएसचे अधिकारी आहेत. आयआरएसमध्ये आल्यानंतर त्यांची पहिली पोस्टींग मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाली. येथे डेप्युटी कमिश्नर म्हणून ते तैनात होते. अत्यंत हुशार व शार्प असल्याने त्यांना आंध्रप्रदेश आणि त्यानंतर दिल्लीतही काही केससाठी पाठविण्यात आलं आहे. समीर यांना ड्रग्ज व नशा यासंबंधित जोडलेल्या प्रकरणाबाबत स्पेशालिस्ट मानलं जातं.