पाटणा/मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आताच बिहार पोलीस विरुद्ध मुंबई पोलीस असे वळण लागले असून, बिहारमधील सर्व राजकारणीही या प्रकारची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करून लागले आहेत. बिहारमधील सर्व राजकारणी आणि पोलीसही मुंबई पोलिसांच्या तपासाविषयी शंका उपस्थित करून लागले आहेत. बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार असल्याने, यानिमित्ताने एकमेकांवर कुरघोडी करण्याचे सर्व राजकारण्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी आलेले पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याच्या सूचना मुंबई महापालिकेने दिल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मुद्दामच बिहार पोलिसांचा याप्रकारे अपमान केला आणि तो आम्ही सहन करणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव यांनी केला. सुशांतचे नातेवाईक असलेले भाजपचे आमदार नीरज सिंह यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली, त्यालाही राष्ट्रीय जनता दलाने पाठिंबा दिला. त्यानंतर बिहारचे पोलीस महासंचालकांनी मुंबई पोलिसांनी केलेला तपास नीट नाही, ते आम्हाला सहकार्य करीत नाहीत आणि या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची मुंबई पोलिसांनी चौकशी केलीच नाही, असे आरोप केले. सुशांतचे १५ कोटी रुपये रिया चक्रवर्तीने हडप केले, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी आता केला आहे.तपासी अधिकाऱ्याचे क्वारंटाइन अयोग्य -नितीश
च्पाटणा: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी बिहार सरकारने नेमलेल्या विशेष तपासी पथकाचे नेतृत्व करणारे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबईला पोहोचताच सक्तीने क्वारंटाइनमध्ये पाठविले जाणे अयोग्य आहे, असे म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्याविषयी नापसंती व्यक्त केली.
च्बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यासंदर्भात महाराष्ट्रातील संबंधितांशी व्यक्तिश: बोलतील, असेही ते म्हणाले. तुम्ही स्वत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात बोलणार का, असे विचारता नितीश कुमार म्हणाले की, हा काही राजकीय विषय नाही. हा बिहार पोलिसांच्या कायदेशीर कर्तव्याशी संबंधित विषय आहे. ते कर्तव्य पूर्ण करण्याचा आम्ही आमच्याकडून सर्व प्रयत्न करू. मात्र सुशांत सिंगच्या दोन बहिणींनी मागणी केल्यानुसार तुम्ही या प्रकरणाच्या सीबीआय तपासाची शिफारस करणार का, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.