मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणात आता नवीन माहिती समोर येत आहे. सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटींचा व्यवहार झाला असल्याचं तपास करताना पोलिसांना स्पष्ट झालं आहे. सुशांतने सुरू केलेल्या कंपन्यांमधून अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंब आर्थिक अफरातफर करत होते का, याची चौकशी होण्याची शक्यता आहे. बिहारपोलिसांच्या विनंतीवरुन अंमलबजावणी संचालनालयाने (ED) प्राथमिक माहिती घेऊन आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तपासानंतर आणखी नवे वळण लागण्याची शक्यता आहे.
सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये पाटणा येथील राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात एक तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी सुशांतकडून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीआधारे बिहार पोलिसांचे एक पथक तपास करण्यासाठी मुंबईत आले. दरम्यान, रियाने धावपळ करत सुप्रीम कोर्टात धाव घेऊन सुशांत आत्महत्येचा तपास मुंबईतच केला जावं अशी मागणी करणारी याचिका केली होती. बिहार पोलिसांनी सुशांतच्या सर्व बँक खात्यांचे व्यवहार तपासले. या तपासानंतर बिहार पोलिसांनी आर्थिक गुन्ह्यांचा सखोल तपास करणाऱ्या ईडीला एक पत्र पाठवले. पत्राद्वारे बिहार पोलिसांनी आर्थिक व्यवहारांच्या सखोल तपासणीची गरज असल्याचे सांगून चौकशी करण्याची विनंती केली. ईडीने मागणी केल्यानंतर बिहार पोलिसांनी सुशांतच्या वडिलांकडून प्राप्त तक्रारीची प्रत त्यांना पाठवून दिली आहे.
ईडीला पोलीस तपासाची प्राथमिक माहिती दिली. या माहितीआधारे ईडीने आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. आता रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येचा महिना उलटून गेल्यानंतरही रोज या प्रकरणात नवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. आता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत राजकारणही तापू लागलं आहे. भाजपाच्या आमदारानं थेट गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून या आत्महत्येचा तपास CBIनं करावा अशी मागणी केली आहे.
सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही सर्व स्थरातून होऊ लागली आहे. दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी या प्रकरणात मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.“सुशांतच्या मृत्यू प्रकरणी बिहार पोलिसांकडून चौकशी केली जात असून मुंबई पोलिसांकडून निष्पक्ष चौकशीत अडथळा आणला जात आहे. त्यामुळे सीबीआयने या प्रकरणाचा तपास करावा असं भाजपाला वाटतं,” असे सुशील कुमार मोदी यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी
मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल
तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्...