मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आर्थिक व्यवहारातील अनियमिततेबद्दल सक्तवसुली संचालनालयाने (ईडी ) शेकडो तास कसून चोकशी केल्यानंतरही त्यांच्याहाती अभिनेत्री रिया चक्रवती व तिच्या कुटूंबियाविरुद्ध अद्याप ठोस पुरावे हाती लागेलेले नाहीत. मात्र तरीही तपास सुरूच ठेवला असून सुशांतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदी हिने नोंदविलेल्या जबाबाच्या अनुषंगाने रिया विरुद्ध पुरावे मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी सुशांतच्या डेबिट, क्रेडिट कार्ड व इंटरनेट बँकिंगद्वारे केलेल्या व्यवहाराची माहिती मिळविण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. श्रुती गेल्यावर्षी जुलैपासून या वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत सुशांतकडे व्यवस्थापक म्हणून काम करत होती.दोन वर्षांपूर्वी सुशांत व रिया एकत्र राहू लागल्यानंतर रिया त्याचे आर्थिक व व्यावसायिक निर्णय घेत होती., दोघाच्या आर्थिक देवाणघेवाण आणि गुंतवणूकीबद्दल आपल्याला काहीही माहिती नव्हते. असा जबाब श्रुतीने ईडीच्या अधिकाऱ्यांना दिला असल्याचे सूत्रांकडून समजते. तिच्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यानी सुशांतसिह व रिया याच्या गेल्या दोन वर्षांपासूनच्या बँक व्यवहाराची सखोल छाननी केली. त्यामध्ये रियाच्या बँक अकाउंटवर कोणतीही मोठी रक्कम हस्तातर केली नसल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजित आणि आई संध्या यांच्या खात्यावरही कोणतीही रक्कम वर्ग करण्यात आलेली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता सुशांतच्या डेबिट, क्रेडिट कार्ड व इंटरनेट बँकिंगवरून कोणत्या वस्तूची खरेदी केली, याबाबतचा तपशील जमविला जात असल्याचे सूत्रांच्याकडून सांगण्यात आले.सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे वडील के के सिंह यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिहार पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. त्याबाबत ६ जुलैला अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी याच्यावर गुन्हा दाखल केला.त्यानंतर दोन दिवसांनी ईडीने या सहा जणाविरुद्ध मनी लॉंड्रीगचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. रिया व महाराष्ट्र सरकारने सीबीआयने तपास करण्याला विरोध दर्शविला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : ईडीकडून रिया चक्रवर्तीविरुद्ध पुराव्याचा शोध सुरूच, श्रुतीच्या जबाबाचा आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 11:23 PM