लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतला गांजा पुरविल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेला त्याचा रूम पार्टनर सिद्धार्थ पिठाणीने जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. येत्या २६ जूनला हैदराबाद येथे त्याचा विवाह आहे, त्यामुळे आपल्याला जामीन देण्याची विनंती त्याने केली असून सुनावणी १६ जून रोजी होईल.
अमली पदार्थ नियंत्रण कक्षने (एनसीबी) १५ दिवसांपूर्वी त्याला हैदराबाद येथून अटक केली. सद्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. गेल्यावर्षी १४ जूनला सुशांतचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला हाेता. त्याचा रूममेट सिद्धार्थ पिठाणीने सुरुवातीला पोलिसांना जबाब दिल्यानंतर ताे बेपत्ता झाला होता. त्याला मे महिन्याच्या अखेरीस एनसीबीच्या पथकाने हैदराबाद येथून अटक केली. त्याला या प्रकरणात सरकारी साक्षीदार बनविले जाणार आहे.
सुशांतच्या घरातील कर्मचारी सॅम्युअल मिरांडा व दीपेश सावंत यांनी एनसीबीला दिलेल्या जबाबानुसार सुशांतला गांजा या अमली पदार्थाचा पुरवठा सिद्धार्थ पिठाणी करून देत असे. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली होती.
पिठाणीचा २६ जूनला विवाह आहे, त्यामुळे जमीनासासाठी एनडीपीएस न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. प्रकरणातील २ व्यक्तींच्या जबाबावरून त्याला अटक झाली. मात्र, त्याच्याकडे अमली पदार्थ सापडले नसल्यामुळे त्याला जामीन देण्यास कुठेही अडचण नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला.