लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासावरून ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ पोलीस असा सामना रंगला. दुसरीकडे सोशल मीडियावर मुंबई पोलिसांविरुद्ध बदनामीचे षड्यंत्र राबविल्याचे समोर येताच, आरोप- प्रत्यारोपांचे राजकारण तापले. मात्र, वर्षभरानंतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.
गेल्या वर्षी १४ जून रोजी अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्याचे वडील, बहिणी यांचे जबाब नोंदवले हाेते. सुशांतने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या तपासात निघाला. अनेक सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली. दरम्यान, ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा आरोप करण्यात आला. सरकारच्या दबावाखाली मुंबई पोलीस काम करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला.
सीबीआयने तपास हाती घेतल्यानंतर मुंबई पोलिसांचा तपास पॉज बटनवर आहे. अशात, मुंबई पोलीस, बिहार पोलीस, ईडी, एनसीबी आणि सीबीआय या पाच यंत्रणांनी तपास करूनही वर्षभराने सुशांतने आत्महत्या केली, की त्याची हत्या झाली? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. हे प्रकरण आता सीबीआयकडे तपासासाठी असल्याने पुढे सीबीआय काेणत्या अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिहार विरुद्ध महाराष्ट्र!
मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुशांतच्या कुटुंबीयांनी बिहार पोलिसांत धाव घेतली. सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बिहार पोलिसांनी मुंबईत चौकशी सुरू केली. प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आणि ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ असा सामना रंगला होता.
मुंबई पोलिसांविरुद्ध षड्यंत्र
सुशांतच्या मृत्यूवरून सोशल मीडियावर मुंबई पोलिसांविरुद्ध बदनामीचे षड्यंत्र सुरू केल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले. ८० हजारांहून अधिक बनावट खाती सापडली. त्यानुसार सायबर विभागाने गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.