मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) याने आत्महत्याच केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यानुसार त्याने इतके टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण शोधण्यासाठी वांद्रे पोलिसांनी अद्याप २७ जणांचे जबाब नोंदविले आहेत. मात्र त्याच्या मृत्यूला दोन आठवडे उलटून सुद्धा त्याच्या मानसिक स्थितीची संपूर्ण कल्पना असणाऱ्या त्याच्या डॉक्टरांचा जबाब नोंदविण्यात आलेला नसून त्यासाठी विलंब का होत आहे? असा सवाल आता कायदेतज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.
सुशांतने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी ज्या २७ जणांचा जबाब नोंदविला त्यात त्याचे वडील, बहिणी यापासून त्याच्या जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती, त्याचे नोकर, मॅनेजर, त्याने ज्या चित्रपटात काम केलेल्या प्रॉडक्शन हाऊसचे आजी माजी अधिकारी, बेडरुमची चावी बनवणाºयापर्यंत सर्वाचा समावेश आहे. त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेली कोणतीही सुसाईड नोट अद्याप पोलिसांना सापडलेली नसून खुद्द कुटुंबीयांनी देखील याबाबत कोणतीही तक्रार केलेली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच शवविच्छेदन करणाºया कुपरच्या पाच डॉक्टरांनी देखील अहवाल देत त्याचा मृत्यू श्वास गुदमरून झाला असून त्यात कोणतीही संशयीत बाब आढळली नसल्याचे अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याने कोणत्या कारणामुळे हे पाऊल उचलले असावे याचा खुलासा त्याच्या मानसिक स्थितीची सर्वात अधिक माहिती असणारे आणि त्याच्यावर उपचार करणारे त्याचे डॉक्टरच करू शकतात. मात्र या डॉक्टरचा जबाबच पोलिसांनी अजून नोंदवला नसल्याने याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.आम्ही सुशांत आत्महत्येप्रकरणी २७ जणांचा जबाब नोंदविला असून डॉक्टरांना मात्र अद्याप जबाबासाठी बोलावलेले नाही. आम्ही सध्या याप्रकरणी सर्व माहिती गोळा करत आहोत आणि त्यानंतरच त्यांचा जबाब नोंदविण्यात येईल. - अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ९...म्हणूनच डॉक्टरचा जबाब महत्वाचा !सुशांतच्या नैराश्यासाठी त्याचा आजार जबाबदार आहे की बाहेरील कोणी त्याला त्या नैराश्यात ढकलले याची अधिकृत माहिती डॉक्टरकडूनच पोलिसांना मिळू शकते. त्याने आत्महत्या केल्याचे तांत्रिक पुरावे व अंतिम शवविच्छेदन अहवालच्या माध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे त्याला टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडणारे कारण पोलीस शोधत असून सुशांतच्या जवळच्या सर्व लोकांचे जबाब त्यांनी नोंदवले आहेत. बाहेरील व्यक्तीने सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडले असल्यास त्याच्याकडून ते पुरावे मिटवले जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचा शोध घेण्यास डॉक्टरचा जबाब नोंदविणे महत्वाचे आहे. - अॅड विशाल सत्यप्रकाश सक्सेना, अॅडव्होकेट, सर्वोच्च न्यायालय