मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतला ड्रग्जचे व्यसन असल्याची त्याच्या कुटुंबीयांना पूर्वकल्पना होती. अनेकदा त्याची बहीण, मेहुणा सिद्धार्थ त्याच्यासाठी गांजा घेऊन येत आणि स्वतःही घेत होते, अशी माहिती सुशांतची प्रेयसी व या प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती हिने दिली.अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) दाखल केलेल्या आरोपपत्रात रियाचा जबाब नमूद आहे. त्यात तिने सुशांतच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले. गेल्यावर्षी १४ जूनला त्याचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला हाेता. एनसीबीला दिलेल्या जबाबात रियाने म्हटले की, सुशांतची प्रकृती अधिकच बिकट होत चालली होती, म्हणून शोविक (रिया चक्रवर्ती हिचा भाऊ) चिंतेत होता. ८ जून २०२० रोजी सुशांतची बहीण प्रियंकाकडून एक व्हाॅट्सॲप मॅसेज आला. यात उल्लेख होता की, लिब्रियम १० एमजी, नेक्सिटाे, ही बंदी असलेली औषधे त्याला द्यावीत, कार्डियोलॉजिस्ट डॉक्टरचे एक प्रिस्क्रिप्शनही तिने दिले होते. त्यांनी सुशांतला ओपीडी पेशंट म्हणून मार्क केले होते आणि न भेटताच ऑनलाईन कंसल्टेशन केले. याचा अर्थ त्याला रुग्णालयात दाखल करणे गरजचे हाेते. कंसल्टेशनशिवाय ही औषधे दिली जाऊ शकत नव्हती. रियाने असेही म्हटले आहे की, या ड्रग्जमुळे त्याचा मृत्यू झाला असता. त्याची बहीण मीतू, ८ ते १२ जूनदरम्यान त्याच्यासोबत होती. मी मुंबई पोलिसांनाही ही गोष्ट सांगितली आहे.
मला भेटण्यापूर्वीच त्याला अमली पदार्थांचे व्यसन होते. ताे मरिजुआना (गांजा) सेवन करायचा. त्याचे हे व्यसन त्याच्या कुटुंबाला माहीत होते. मी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा माझ्याकडे पुरावा आहे. परंतु, सुशांत तयार नव्हता. त्याची बहीण आणि मेहुणा सिद्धार्थ हेही सुशांतबरोबर ‘मरिजुआना’ सेवन करायचे.