अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी सर्व केसेस मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यासाठी रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान आपलेही म्हणणे ऐकण्यात यावे, यासाठी सुशांतच्या कुटुंबीयांनी सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. मात्र, या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला. अलका प्रिया यांनी ही याचिका दाखल केली होती.
सध्या पोलीस सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांना त्यांचं काम करू द्या, असं सर्वोच्च न्यायालयानं अलका प्रिया यांच्या याचिकेवर भाष्य करताना म्हटलं आहे. या प्रकरणाशी अलका यांचा थेट असा कोणताही संबंध नाही. त्यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जावं, अशी सूचना न्यायालयानं केली. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.