२३ वर्षीय पैलवान सागर राणाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला ऑलम्पिक पदक विजेता सुशील कुमारला आणखी एक जोरदार झटका दिला आहे. दिल्लीपोलिसांकडून सुशीलचा शस्त्रास्त्र परवाना निलंबित करण्यात आला आहे. लायसन्स विभागाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती दिल्लीपोलिसांनी दिली. याआधी उत्तर रेल्वेने सुशील कुमारला सेवेतून निलंबित केल्यामुळे त्याच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली होती. आता शस्त्र परवाना देखील गमावून बसला आहे.
ऑलम्पिक पुरस्कार विजेता सुशील कुमार हा उत्तर रेल्वेचा वरिष्ठ वाणिज्यिक व्यवस्थापक होता. 2015 पासून तो प्रतिनियुक्तीवर दिल्ली सरकारमध्ये कार्यरत होता. त्याला शालेय स्तरावरील खेळाच्या विकासासाठी छत्रसाल स्टेडियमवर विशेष अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, कुमार यांना २०१२ मध्ये देण्यात आलेला शस्त्रास्त्र परवाना रद्द करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस थेट त्यांच्या घरी पाठविण्यात आली असून सुशील कुमार याला प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी १० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.