Sushil Kumar in Police custody: हत्या प्रकरणात 17 दिवसांपासून फरार असलेल्या ऑलिंपिक पदक विजेता पहेलवान सुशील कुमारला (Sushil Kumar) दिल्ली पोलिसांनी अटक केली. आज त्याला दिल्ली न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनीसुशील कुमारच्या साथीदारालादेखील अटक केली आहे. (Wrestler Sushil Kumar sent to 6-day police custody in killing of 23-year-old Sagar Rana at Chhatrasal Stadium)
गेल्या काही दिवसांपासून सुशील कुमार फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी दिल्ली, हरियाणा, पंजाबमध्ये छापे टाकले होते. शनिवारी सायंकाळी त्याला अटक केल्याचे वृत्त आले होते. हे वृत्त नंतर फेटाळण्यात आले. मात्र, सकाळी दिल्ली पोलिसांनी पुन्हा अटकेचे वृत्त खरे असल्याचे स्पष्ट केले. राजधानीच्या उत्तरेला असलेल्या छत्रसाल स्टेडियमबाहेर ज्युनिअर सुवर्णपदक विजेता मल्ल सागर राणा याच्या हत्येप्रकरणी आरोपी सुशील कुमार फरार होता.
ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता अनुभवी पहेलवान सुशील कुमार याची अटकपूर्व जामीन याचिका रोहिणी सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळली होती. पोलिसांचा ससेमिरा चुकवून अज्ञातस्थळी दडून बसलेल्या सुशीलचा शोध घेणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. याशिवाय सुशीलचा खासगी सचिव अजय हा देखील फरार असून, त्याला शोधून देणाऱ्यास ५० हजारांचा रोख पुरस्कार दिला जाणार होता. सुशील कुमारचा खाजगी सचिव अजय कुमारला देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सुशील कुमारला 12 दिवसांची पोलीस कोठडी देण्य़ाची मागणी करण्यात आली. मात्र, सुशीलच्या वकिलांनी यास विरोध केला. सुशील कुमारने हत्या केली त्या दिवशी एकूण पाच जणांना उचलून आणण्यात आले होते. त्यांना छत्रसाल स्टेडिअममध्ये आणून जणावरांसारखी मारहाण करण्यात आली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. या सर्व कटाचा तपास करण्य़ासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच आरोपी सुशील कुमारचे असोदा गँगशी संबंध असल्याचे सांगितेले जात आहे. सोनू नावाचा जखमीदेखील एका गँगचा आहे, यामुळे या कटाचा तपास करण्यासाठी ही कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.
मात्र, सुशीलच्या वकिलांनी घटनेचा मुद्देमाल जप्त करण्यासाठी एक दिवसाचा वेळ पुरेसा असल्याचे न्यायालयाला सांगत यास विरोध केला. अखेर न्यायालयाने सुशील कुमारला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविले.