लोकमत न्यूज नेटवर्क, शरद जाधव/सांगली: जिल्ह्यात गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीला गेल्या आठवड्यात जेरबंद केले होते. या टोळीचे लागेबांधे ओडिशा राज्यात असल्याची माहिती मिळाल्यावरून एलसीबीच्या पथकाने तिथे जाऊन संशयिताला ताब्यात घेतले. संजीव पत्रिक बेहरा (वय २७, रा. किर्तीकी जि. गजपती, ओडिशा) असे संशयिताचे नाव असून, याच्यासह गुरुजी ऊर्फ हुसेन मैनुद्दीन मुल्ला (वय ४८, रा. माळी गल्ली, मिरज) यालाही पोलिसांनी अटक केली.
या टोळीकडून यापूर्वीच २० लाख ४० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील गांजा विक्री व तस्करीवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यात पथकाने कवठेपिरानजवळ कारवाई करत चारजणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून २० लाख ४० हजार रुपये किमतीचा वाळलेला गांजा व गुन्ह्यात वापरलेली मोटार असा २८ लाख ९० हजार रुपयांचा माल जप्त केला होता.
गुन्ह्यातील १०२ किलो गांजा हा ओडिशातून आणल्याचे माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर एलसीबीचे पथक ओडिशा राज्यात गेले होते. या गुन्ह्यातील पसार संशयित कुमार प्रभा लिमा ऊर्फ राजू भाई याचा शोध सुरू होता. हा परिसर अतिशय दुर्गम व जंगल भागातील असल्याने तपासात आव्हान होते. तरीही पथकाने तपास करत राजू भाईचा साथीदार असलेल्या संजीव बेहरा यास शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, जितेंद्र जाधव, संदीप पाटील, राहुल जाधव, आर्यन देशिंगकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
सहाजण यापूर्वीच ताब्यात
याच गुन्ह्यात यापूर्वीच अदील नासीर शहापुरे (रा. बाबर गल्ली, सांगली), सचिन बाबासाहेब चव्हाण (रा. कवठेपिरान), मयूर सुभाष कोळी (रा. शंभरफुटी रोड, सांगली) आणि मतीन रफक्षक पठाण (रा. राधाकृष्ण वसाहत, सांगली) यांना अटक करण्यात आली आहे.
मिरजेतील ‘गुरुजी’चे ओडिशा कनेक्शन
ओडिशातून ताब्यात घेतलेल्या बेहरा याने गुन्ह्याची कबुली देत मिरज येथील गुरुजी ऊर्फ हुसेन मुल्ला याला गांजा दिल्याचे सांगितले. मिरजेतील या गुरुजीवर यापूर्वीही गांजा तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे.