पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: ३ महीने ३ दिवसापूर्वी गॅस सिलिंडरला गळती होऊन स्फोटात मृत पावलेल्या गर्भवती शिवानी रजावत (वय २६) आणि तिची आई जयदेवी चव्हाण यांच्या खून प्रकरणात वास्को पोलिसांनी ५ जानेवारीला अटक केलेला शिवानीचा पती अनुरागसिंग रजावत याला बुधवारी (दि.२१) न्यायालयाने जामीन मंजूर केली. अनुरागसिंग रजावत याला दक्षिण गोवा जिल्हा प्रधानसत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती मिळाली.
१८ नोव्हेंबरला सकाळी तो स्फोट झाला होता. नवेवाडे येथील जय संतोषी माता मंदिरामागील नील पार्वती इमारतीच्या पहील्या मजल्यावर शिवानी राजावत तिचे पती अनुरागसिंग आणि काही दिवसापूर्वी तेथे आलेली शिवानीची आई जयदेवी सोबत राहायची. गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात शिवानी आणि जयदेवी यांचा मृत्यू झाल्यानंतर शुभमसिंग चव्हाण यांनी त्याची बहिण आणि आईच्या मृत्यू मागे घातपाताचा संशय व्यक्त केला होता. तसेच त्यांनी बहिण शिवानी आणि आई जयदेवी यांचा षडयंत्र रचून त्यांची हत्या केल्याचा आरोप करून त्याबाबत लेखी तक्रार पोलीसांना दिली होती. शिवानी आणि जयदेवी यांची हत्या शिवानीचे पती अनुरागसिंग यांनी केल्याचा दाट संशय शुभमने व्यक्त केला होता. हुंड्याच्या मुद्यावरून आणि अन्य विषयावरून बहिण शिवानी आणि आई जयदेवी यांची हत्या केल्याचा संशय शुभमसिंग यांनी व्यक्त केला होता. शिवानीचा मृत्यू विवाहाच्या सात वर्षाच्या आत झाल्याने मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी त्याप्रकरणात चौकशी करित होते तर जयदेवीच्या मृत्यू प्रकरणात वास्को पोलीस चौकशी करित होते. शिवानीच्या मृत्यू प्रकरणात उपजिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून नंतर त्याचा अहवाल पोलीसांना सादर केला. तसेच त्यांनी शिवानीच्या मृत्यू प्रकरणात परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे योग्य चौकशी करण्याचे आदेश पोलीसांना दिले होते. त्यानंतर पोलीसांनी चौकशी करून २३ डीसेंबरला शिवानीच्या मृत्यू प्रकरणात तिचा पती अनुरागसिंग रजावत विरुद्ध हुंडाबळीचा ठपका ठेवत त्याच्याविरुद्ध भादस ३०४ बी कलमाखाली गुन्हा नोंद केला होता.५ जानेवारीला उशिरा रात्री पोलीसांनी शिवानी आणि तिची आई जयदेवी यांच्या मृत्यू प्रकरणात अनुरागसिंग रजावत विरुद्ध भादस ३०२ हा खूनाचा गुन्हा नोंद करून अनुरागसिंग याला अटक केली होती. शिवानी आणि जयदेवी यांच्या मृत्यू प्रकरणात चौकशीवेळी अनुरागसिंग रजावत योग्यरित्या सहकार्य करत नसल्याने त्याच्यावर कारवाई करून त्याला अटक केल्याची माहीती तेव्हा पोलीस निरीक्षक कपील नायक कडून मिळाली होती. शिवानी आणि तिची आई जयदेवी यांच्या खूनाच्या प्रकरणात अटक केलेला अनुरागसिंग रजावत हा भारतीय नौदलाचा कर्मचारी असल्याची माहीती मिळाली होती.
५ जानेवारीला पोलीसांनी अनुरागसिंग याला अटक केल्यानंतर त्याला पोलीस कोठडीत घेऊन त्याच्याशी खून प्रकरणातील चौकशी पूर्ण केल्यानंतर त्याला न्यायालयीत कोठडीत पाठवण्यात आले होते. बुधवारी दक्षिण गोवा जिल्हा प्रधानसत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष इरशाद आगा यांनी अनुरागसिंग रजावत याला जामीन मंजूर केल्याची माहीती वास्को पोलीसांकडून मिळाली.