रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले रायगडावरील समाधीला राख मिश्रित लेप लावणे आणि पुस्तकाचे पूजन करणाऱ्या दाेन व्यक्तींना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा जबाब नाेंदवण्यात आला आहे, तसेच सापडलेले साहित्य रासायनिक विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे, अशी माहिती पाेलिस सुत्रांनी दिली. अस्थी मिश्रित लेप हे दिवंगत शिवप्रेमी बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
बुधवारी 8 डिसेंबर राेजी दुपारी किल्ले रायगडावर पुण्याहून काहीजण आले हाेते. शिवप्रेमींना जगदीश्वर मंदिरा जवळच्या चौथऱ्यावर काही व्यक्तींच्या हालचाली या संशयास्पद असल्याचे आढळून आले. यामुळे त्यांनी या संशयास्पद व्यक्तींचा पाठलाग केला. चार ते पाच व्यक्ती या जगदिश्र्वर मंदिरा जवळच्या चौथऱ्यावर मंत्रोच्चार करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला लेप लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आराेप त्यांनी केला. याठिकाणी पुस्तकाचे पूजन देखील करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने त्यांना शिवप्रेमींनी रोखले होते. गडावर काही काळ तणावाचे वातावरण हाेते. त्यानंतर पाेलिसांना पाचारण करण्यात आले. असे काेणतेही कृत्य करण्यात आले नसल्याचे संबंधीत संशयीत व्यक्तींनी पाेलिसांना सांगितले. संशयित व्यक्तींचे महाड येथील तालुका पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यांच्याकडील राख मिश्रित लेप ताब्यात घेऊन रासायनिक विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. दरम्यान, संशयीत व्यक्तींचे स्थानिक पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आले आहेत. गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.