आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २७ : सुप्रीम कॉलनीत राहणा-या अनिता राज राजपूत (वय ३१) या महिलेचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. मृतदेह जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.शेजारच्यांनी दवाखान्यात हलविलेयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या आठवड्यापासून अनिता राजपूत ही महिला आजारी होती व दोन दिवसापूर्वीच तिची दवाखान्यातून सुटका झाली होती. मंगळवारी पुन्हा प्रकृती खालावल्याने शेजारच्या लोकांनी तिला खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले, तेथे डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात नेण्यात सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात येत असताना रस्त्यातच या महिलेची प्राणज्योत मालवली. वैद्यकिय अधिकारी डॉ.विसपुते यांनी अनिता यांना मृत घोषीत केले.
मूळची खामगाव येथील रहिवासीअनिता राजपूत ही महिला मुळची खामगाव येथील असल्याचे शेजारच्यांनी सांगितले. सुकलाल पूनमचंद राजपूत यांच्या घरात पाच वर्षांपासून ती एकटीच भाड्याने राहत होती.जळगाव शहरात तिचे कोणीच नातेवाईक नाहीत. पाच वर्षात तिला कोणीच भेटायला देखील आले नव्हते. जिल्हा रुग्णालयात मृतदेह आल्यानंतर हेडकॉन्स्टेबल संजय पाटील व अशपाक शेख या दोघांनी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली, मात्र अनिताचे कोणीही नातेवाईक नसल्याने मृतदेह घ्यायला कोणीही तयार होत नव्हते.