दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथे दोन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याचा संशय आहे. सोमवारी संध्याकाळी ही दोन मुलं आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेली होती, ती घरी परतलीच नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून शोधकार्य सुरु केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास सेंट्रल मुंबईला नागपाडा येथे राहणारी मुले आपल्या मित्रांसोबत प्रियदर्शनी पार्क येथे गेली होती. १४ ते १५ वयोगटातील या दोन मुलांसोबत त्यांचे तीन मित्र होते. प्रियदर्शनी पार्क येथे गेल्यानंतर मुले पोहण्यासाठी समुद्रात उतरली होती. तिथे बॅरिकेड नसल्याने मुलं सहजपणे आत गेली आणि पाण्यात खेळू लागली अशी माहिती सूत्रांनी दिली. मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलं बुडू लागल्यानंतर इतर तिघांनी मदतीसाठी आरडाओरड सुरु केली. पार्कच्या सुरक्षारक्षकाने धाव घेतली मात्र त्याला मुले दिसली किंवा सापडली नाहीत”. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. त्याप्रमाणे त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरु आहे. अद्याप मुलांचा पत्ता लागला नसून त्यांना शोधण्यासाठी पथक कार्य करत आहे.