पुसद (यवतमाळ) : उत्तर प्रदेशातीलएटीएसच्या पथकाने येथील शिवाजी चौकातून एका डाॅक्टरला रविवारी रात्री ताब्यात घेतले. या कार्यवाहीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणाशी आर्थिक संबंध असल्याच्या संशयातून ही कार्यवाही केल्याचे समजते.
डॉ. फराज शाह असे उत्तर प्रदेश पोलिसांच्याएटीएस पथकाने ताब्यात घेतलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील एटीएसच्या पथकाने रविवारी पुसद गाठले. येथे आल्यानंतर त्यांनी डॉ. शाह यांना शहरातील शिवाजी चौकात असलेल्या त्यांच्या दवाखान्यातून रविवारी रात्री ताब्यात घेतले. वसंतनगर पोलीस ठाण्यात याची नोंद घेण्यात आली आहे. डॉ. शाह यांना दवाखान्यातून ताब्यात घेतल्यानंतर पथक उत्तर प्रदेशच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, उत्तर प्रदेशातील एटीएसच्या पथकाने ही कार्यवाही न्यायालयाच्या आदेशावरून केल्याचे समजते.
तीन महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये बळजबरी धर्मांतर प्रकरण पुढे आले होते. याच प्रकरणाशी आर्थिक संबंध असल्याच्या संशयातून ही कार्यवाही केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.