मडगाव: गोव्यात गाजलेल्या विजया पागी (५४) या स्थानिक मासळी विक्रेत्या महिलेचा बलात्कार करुन नंतर तिचा खून केल्याच्या आरोपातून संशयित राम भरोसा मांजी (२१) याची आज बुधवारी निर्दोष सुटका झाली. या खून प्रकरणात मांजी याच्याकडून मयत महिलेचा मोबाईल विकत घेतल्याप्रकरणी अटक झालेल्या विकासकुमार साहु यालाही न्यायाधीक्षाने निर्दोष ठरविले.
गोव्यातील मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीक्ष डी. पाटकर यांच्या न्यायालयाने हा निवाडा दिला. ३१ जानेवारी २0१४ साली मास्तिमळ - काणकोण येथे खुनाची ही घटना घडली होती. क्राईम ब्रँचने या खून प्रकरणाचा तपास करुन संशयितांविरुध्द न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
विजया पागी या मासळी विक्री करीत होत्या. घटनेच्या दिवशी मास्तिमळ येथून जात असताना संशयित मांजी याने तिच्यावर बलात्कार करुन नंतर तिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप होता. नंतर तिच्याकडील मोबाईल व पाचशे रुपये त्याने पळविले होते. मागाहून हा मोबाईल त्याने बिहार येथील आपला मित्र साहू याला विकला होता असे न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले होते. मांजी हा कामगार म्हणून काम करीत होता.
एका स्थानिक महिलेचा खून होउनही तपास लागत नसल्याने विजया पागी खून प्रकरणी काणकोणात वातावरण तापले होते. स्थानिकांनी मोर्चाही आणला होता. गोव्याचे तत्कालीन मुख्यंमत्री मनोहर पर्रिकर यांनी नंतर या खून प्रकरणाचे तपासकाम क्राईम ब्रँचकडे दिले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन नंतर संशयितांना अटक केली होती. या खून खटल्यात सरकारपक्षातर्फे एकूण ४६ साक्षिदारा न्यायालयात तपासण्यात आले. मांजी याच्याविरुध्द एकही गुन्हा शाबीत होऊ शकला नाही. सबब न्यायालयाने त्याला निर्दोष सोडले. तरसाहू याला पोलिसांनी अटक केल्यानंतर तो जामिनावर सुटला होता.