मुंबई - बोगस कागदपत्रांच्याआधारे जामीन मिळवून देणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यात जामिनदारासह मुख्य आरोपींचा समावेश आहे. शाकीर हुसैन मेहंदी हसन खान, शफीक रफिक कुरेशी, फय्याज अमानउल्ला खान, इम्रान युसूफ सलमानी, मोहम्मद परवेज अब्दुल शेख, रियाज अहमद मुस्ताक अहमद पठाण, मुज्जपफर दाऊद काझी आणि युसूफ रमजान खान अशी या आठ आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी शाकीर, शफीक, इम्रान आणि फय्याज हे चौघेही रिक्षाचालक असून मोहम्मद परवेज हा बिगारी कामगार आणि युसूफ इलेक्ट्रिशियन आहे. तसेच मुज्जफरचा स्वत:चा व्यवसाय असल्याचे पोलिसांनी सांगितले. आठही आरोपींना आज दुपारी येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 3 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या आरोपींकडून एक प्रिंटर, स्कॅनर मशीन, एक लॅपटॉप, चार पेनड्राईव्ह, 55 बोगस रबरी शिक्के, 78 खर्या शिधावाटप पत्रिकेमध्ये बनावटीकरण केलेल्या शिधावाटप पत्रिका, 92 शिधावाटपेचे कोरे फॉर्म, 52 कंपन्याचे ओळखपत्रे, 59 कंपन्याचे वेतन पावत्या, 12 मार्कशिटच्या झेरॉक्स प्रती, 8 सत्र न्यायालय, मुंबई यांचे जामिनदार पडताळणी करण्याबाबतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने दिलेले पत्र, 4 जामिनदारांच्या वास्तव्य पडताळणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सत्र न्यायालयात सादर केलेले बोगस अहवाल, 5 शाळा-कॉलेजचे कोरे दाखले, 7 बोगस कंपन्याचे लेटर हेड आणि शाळा सोडल्याचे सहा दाखले आदी मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.