वाकड : हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत जमीन बळकाविण्यासाठी 'लँड माफियां' ची एजंट म्हणून मदत केली, असा आरोप करत त्यांचे निलंबन करावे, या मागणीसाठी हिंजवडीतील साखरे कुटुंबियांसह ग्रामस्थांनी पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन शुक्रवारी केले.पुण्याचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली दीड तास चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचा निषेध असो, एजंट पीआयचे निलंबन करा, मांडोली अधिकाऱ्यांचे निलंबन करा, पिंपरी-चिंचवड पोलिसांचा निषेध, आमच्याकडे जमीन बळकावून मिळेल (संपर्क हिंजवडी पोलीस ठाणे) अशा आशयाचे फलक घेतलेल्या तरुणांनी घोषणाबाजी केली. सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल यांच्याकडे याबाबतच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. हिंजवडी येथे दि. १८ सप्टेंबर रोजी हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून जमीन बळकाविण्यासाठी लँड माफियांना त्यांचा एजंट म्हणून मदत केली. तसेच विक्रम साखरे कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी दिली. पोलीस खात्यातील गुंडगिरीचे हे उदाहरण आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी होऊन पीआय गवारे यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, असे निवेदनात नमूद केले आहे...............
भावकीतील जागेचे हे भांडण आहे. पूर्वी दोन्हीही पक्षांना बोलावून कायदेशीर समज दिली होती. जागेची मोजणी करून झाली. प्रत्येकाच्या हद्द निश्चित झाल्या होत्या. त्यापैकी एकाने बांधकामास सुरुवात केल्याने भांडणे सुरू झाली. आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गेलो आणि न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. तसेच कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची समज दिली. अटक कोणाला करायचे ते पाहू असेही म्हणलो. मात्र भावकीच्या भांडणात पोलिसांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्हाला ह्यटार्गेटह्ण करण्यात येत आहे.- यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी