पिंपरी : पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणाची तक्रार देण्यास गेलेल्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवला. तसेच रात्री दोनच्या सुमारास मोबाईलवर संपर्क साधून अश्लिल संभाषण केल्याप्रकरणी महिलांनी एकत्रित येवून तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. चिखली पोलीस ठाण्याअंतर्गतच्या साने चौक पोलीस चौकीतील सहायक फौजदार रामनाथ पालवे असे निलंबन कारवाई झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती पत्नीचे भांडण झाले. त्यामुळे ९ आॅक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास पीडित महिला पोलीस चौकीत तक्रार नोंदविण्यास गेली. तेथे सहायक फौजदार रामनाथ पालवे होते. त्यांनी महिलेचे म्हणणे ऐकुन घेत असताना, त्या महिलेशी गैरवर्तन केले. पीडित महिलेच्या खांद्यावर हात ठेवुन बोलत असल्याने ही महिला घाबरली. पोलीस अधिकाऱ्याचे वर्तन ठीक नसल्याने तक्रार नोंदवुन ही महिला ११ च्या सुमारास तेथून निघून गेली. तक्रारअर्जावर महिलेने तिचा मोबाईल क्रमांक दिला होता. सहायक फौजदार पालवे यांनी त्याच रात्री दोनच्या सुमारास महिलेशी मोबाईलवरून संपर्क साधला. तिच्याशी अश्लिल संभाषण केले. तसेच आता सर्व काही ठीक आहे ना? अशी विचारपूस केली. घडल्या प्रकाराने महिलेची मनस्थिती बिघडली. या महिलेने शहर काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे यांची भेट घेतली. त्यांना घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. कुदळे पीडत महिलेसह अन्य महिलांना घेवून पोलीस ठाण्यात गेल्या. पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर यांची भेट घेतली. महिलांनी केलेल्या तक्रारीची प्रत पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनाही देण्यात आली. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी गंभीर दखल घेवुन सहायक फौजदार पालवे यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. शहरात महिंलावरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. कधी पीडित महिलाची तक्रार घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जाते. तर कधी तक्रार देण्यास आलेल्या महिलेच्या असहयतेचा गैरफायदा उठविण्याचा पोलिसांकडून प्रयत्न होत आहे. तक्रारदार महिलेची पोलीस अधिकाऱ्याकडून छेडछाड होण्याची घटना गंभीर असल्याने तातडीने कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदार महिलेशी अश्लिल वर्तन करणाऱ्या पोलिसाचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 4:09 PM
रात्री दोनच्या सुमारास मोबाईलवर संपर्क साधून अश्लिल संभाषण केल्याप्रकरणी महिलांनी एकत्रित येवून तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली.
ठळक मुद्देपोलीस अधिकाऱ्याकडून छेडछाड होण्याची घटना गंभीर असल्याने तातडीने कारवाई शहरात महिंलावरील अत्याचाराच्या घटनात वाढ