मुंबई - कुस्तीपटू व सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) नरसिंग यादवविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी यादवविरोधात विभागीय चौकशीही केली जाणार आहे. उत्तर-पश्चिम मुंबईचे काँग्रेसचे उमेदवारसंजय निरुपम यांचा प्रचार यादव यांना भोवला त्यामुळे त्यांच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रविवारी काँग्रेसच्या प्रचारावेळी स्टेजवर इतर नेत्यांसह यादवही उपस्थित होता. सरकारी अधिकाऱ्याला निवडणुकीचा प्रचार करता येत नाही. याबाबत वरिष्ठांना सांगितल्यानंतर बंदोबस्ताला तैनात पोलिसांकडून याबाबतची माहिती घेण्यात आली. त्यानुसार, निवडणूक आयोगालाही कळवण्यात आले. सोमवारी या आरोपांची शाहनिशा करण्यासाठी व्हिडीओ आणि फोटो यांची पडताळणी करण्यात आली. त्यात यादव यांचा सहभाग आढळल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादव हे सध्या मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर नियुक्त होते.
रिप्रेझेंन्टेटीव्ह ऑफ पोलीस कायद्याच्या कलम 129 (2) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी अधिकाऱ्याने मतदारांवर दबाव अथवा प्रकार केल्यानंतर या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. यादव यांच्या विरोधात लवकरच विभागीय चौकशी सुरू होईल. यादवने 2010 मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. त्यानंतर त्यांच्या महाराष्ट्र पोलीस दलात उपअधिक्षक पदावर नियुक्तीचा आदेश देण्यात आले होते. मात्र, त्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे 2012 मध्ये यादवला या पदावर नियुक्ती मिळाली.
निरूपम यांचा प्रचार भोवला; कुस्तीपटू नरसिंग यादवविरोधात गुन्हा