पाचोरा जि. जळगाव : करणी केल्याच्या संशयावरुन मोठा भाऊ आणि भावजयीची ओल्या वस्त्रानिशी गावातून धिंड काढल्याची घटना सारोळा ता. पाचोरा येथे २४ रोजी सकाळी घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात लहान भाऊ व त्याच्या परिवारासह सात जणांविरुद्ध जादू टोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सारोळा ता. पाचोरा येथे दोघा भावांमधील अंतर्गत वाद असला तरी या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. देवीदास धोंडू पाटील, मंगलाबाई देवीदास पाटील, गणेश देवीदास पाटील, ज्योती देवीदास पाटील, मयुरी अनिल पाटील, अनिल देवीदास पाटील (सर्व रा. सारोळा ता. पाचोरा) व विलास शिंदे (रा. जांभई ता. सिल्लोड) अशी या गुन्हा दाखल झाले्ल्या सात जणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश धोंडू पाटील व रंजनाबाई रमेश पाटील हे सारोळा येथे मुलगा शांताराम व सुन दैवशाला हिच्यासह वास्तव्यास आहेत. शेती करुन ते कु टुंबाचा चरितार्थ चालवितात. रंजनाबाई ही करणी करते या संशयावरुन वरील सातही जण २४ रोजी सकाळी त्यांच्या घरासमोर आले आणि शिवीगाळ केली. तसेच गायीवर करणी केल्याने त्यांनी रंजना व तीच्या पतीच्या अंगावर पाणी टाकले आणि ओल्या कपड्यानिशी गावातून धिंड काढली आणि मारुतीच्या मूर्तीवर पाणी टाकण्यास भाग पाडले. यानंतर शनिवारी सकाळी ८ वाजता वरील सर्व आरोपी रंजना यांच्या घरासमोर आले व त्यांनी या परिवाराला शिवीगाळ केली. यावर पती व मुलगा त्यांना समजून सांगण्यास गेले असता या सर्वांनी या चारही जणांना मारहाण केली व यांना आता सोडू नका..अशी धमकी भरली.
गेल्या तीन - चार वर्षापासून करणीचा संशय घेतला जात आहे. वैतागलेले रंजनाबाई व त्यांचा परिवार रविवारी सकाळी पाचोरा पोलीस ठाण्यात पोहचला आणि आपबिती कथन केली. यावेळी अंनिस कार्यकर्त्या दर्शना पवार (अमळनेर), अंनिसचे तालुकाध्यक्ष प्रा. अतुल सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. बी.एन. पाटील, अरुणा उदावंत, वैशाली बोरकर, डी.आर. कोतकर यांच्यासह सारोळा खुर्दचे सरपंच पती शिवदास पाटील, पोलीस पाटील सिद्धार्थ अहिरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शांताराम पाटील, अरुण पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी दोन्ही बाजू समजून घेतल्या. समोरच्या गटानेही रमेश पाटील व त्यांच्या परिवाराविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे.
करणीच्या संशयावरून हा प्रकार झाला असल्याचा संशय आहे. पाणी कुणी टाकले?, धिंड काढली की स्वतःहून पाणी टाकायला गेले हा तपासाचा भाग आहे. फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. गावात चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.- किसनराव नजन पाटील, पोलीस निरीक्षक, पाचोरा.
दोन्ही भावांमधील हा वाद आहे. गावकऱ्यांनी बऱ्याचवेळा हा वाद मिटवला आहे. मात्र झालेला प्रकार आमच्या पश्चात घडला आहे. किरकोळ वादाला मोठे स्वरूप देण्यात आले आहे. - शिवदास पाटील, सरपंच पती, सारोळा खुर्द ता. पाचोरा.
बांधावरून गुरे नेल्याप्रकरणी हाणामारी, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाली आहे. बांधावरुन गुरेढोरे नेल्याने शिवीगाळ व मारहाण केली. या प्रकरणी जेठ रमेश धोंडू पाटील, पुतण्या शांताराम पाटील, जेठणी रंजनाबाई पाटील, वैशाली पाटील, गणेश मुरलीधर भवर, मुरलीधर भवर अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल दाखल करण्यात आली आहे. मंगलाबाई देविदास पाटील यांनी ही फिर्याद दिली.