आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राने डॉक्टर मित्राला दिली क्रूर शिक्षा, आधी गळा दाबला, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 06:32 PM2021-09-28T18:32:18+5:302021-09-28T18:33:16+5:30
Crime News: मध्य प्रदेशमधील एका डॉक्टरचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. दरम्यान पोलिस तपासामध्ये ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले आहे.
रायपूर - छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये तीन दिवसांपूर्वी हॉटेलच्या एका खोलीत मध्य प्रदेशमधील एका डॉक्टरचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. दरम्यान पोलिस तपासामध्ये ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले आहे. गुरुनानक चौकातील हॉटेल संदीपच्या खोलीमध्ये मध्य प्रदेशमधील शहडोल येथील डॉक्टर जितेंद्र विश्वकर्मा यांच्या संशयास्पद परिस्थितीत झालेल्या मृत्यू प्रकरणी शॉर्ट पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर हा खुलासा झाला आहे. डॉ. जितेंद्र यांनी गळफास लावून आत्महत्या केली नाही. तर त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये थांबलेला त्यांचा मित्र अजय निषाद याने त्यांची गळा आवळून हत्या केली होती. तसेच हत्या केल्यानंतर आरोपीने त्यांचा मृतदेह फासावर लटकवला होता. (Suspicion of having illicit relationship with mother, friend Murder doctor friend )
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अजय त्याच्या बहिणीची गुणपत्रिका रिन्युअल करून घेण्यासाठी जितेंद्र यांना घेऊन रायपूरमध्ये आला होता. दरम्यान, हत्येच्या घटनेपूर्वी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्या वादातून अजयने जितेंद्र यांची हत्या केली. हॉटेलचे मॅनेजर आणि तिथे असलेल्या अन्य लोकांनी या दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अजय निषाद याच्या आईचे डॉ. जितेंद्र विश्वकर्मा यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून त्यांच्यामध्ये वादही झाला होता. मात्र जितेंद्र यांनी असे काही नसल्याचे सांगत आरोपीची समजूत काढत होता. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी तपासादरम्यान, पोलिसांना याबाबत माहिती दिली होती.
डॉक्टर जितेंद्रची हत्या केल्यानंतर अजय हॉटेलच्या खोलीला बाहेरून बंद करून निघून गेला. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीनेच काचेच्या तुकड्याने दोरी कापून जितेंद्र यांचा मृतदेह खाली उतरवला होता. आता पोलिसांनी या घटनेत नवी माहिती समोर आल्यानंतर आरोपी अजय निषाद याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.