सूर्यकांत वाघमारे,लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : ऑनलाइन जुगार प्रकरणात पोलिसांना हव्या असलेल्या आरोपीचे अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. त्याच्याकडे काम करणारा एक तरुण चार वर्षांपासून बेपत्ता आहे. या दरम्यान, त्याचा कसलाही संपर्क झालेला नसल्याने त्याची हत्या केली असावी, असा संशय बेपत्ता तरुणाच्या कुटुंबीयांनी वर्तविला आहे.
गुन्हे शाखा पोलिसांनी सीबीडी येथील ऑनलाइन जुगारावर कारवाई केल्यानंतर, अड्डाचालक संभाजी पाटील याची धक्कादायक कृत्ये समोर येत आहेत. संभाजी हा अनेक वर्षांपासून अवैध धंद्यात असल्याने त्याच्या भ्रष्टाचाराची मुळे खोलवर रोवलेली आहेत. यामुळेच त्याच्या अटकेत विलंब होत असल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, त्याच्याकडे काम करणारा सत्यवान पानेरे (२७) हा चार वर्षांपासून बेपत्ता आहे. पानेरे हा मूळचा सांगलीच्या कारवे गावचा असून, संभाजी पाटील यांच्याकडे कामाला होता. मात्र, दहा वर्षे काम करूनही त्याला नियमित पगार दिला जात नव्हता. मात्र, फेब्रुवारी, २०१६ मध्ये सत्यवान याने आजवरच्या कामाचा हिशोब संभाजीकडे मागितला होता. यावरून संभाजीने त्याला बेदम मारहाण केली होती, शिवाय दुसऱ्या दिवशी संभाजी हाच त्याला सोबत घेऊन गेला होता. मात्र, त्यानंतर सत्यवानबाबत आजपर्यंत काहीही माहिती समोर आलेली नसल्याचे त्याचा भाऊ सुखदेव पानेरे यांनी सांगितले.सत्यवानला संभाजीकडून दहा वर्षांच्या पगाराचे २० लाखांहून अधिक रुपयांचे येणे होते.
घातपाताची शक्यता घटनेच्या दिवशी सत्यवानने ही रक्कम मागितल्यानेच, त्याला मारहाण करून त्याच्यासोबत घातपात केल्याची शक्यता सुखदेव यांनी वर्तवली आहे. संभाजीनेअनेक तरुणांना लॉटरी सेंटरमध्ये कामाला लावतो, असे सांगून आर्थिक पिळवणूक केली आहे.