लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दिराशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नी भावना अमित बागडी (२४), मुलगी खुशी (६) आणि मुलगा अंकुश (८) या तिघांची लाकडी बॅटच्या साहाय्याने अमित धर्मवीर बागडी (२९) या पतीने निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी ७:०० ते ११:०० वाजण्याच्या दरम्यान हे हत्याकांड केल्यानंतर आरोपी अमित पसार झाला. त्याच्या शोधासाठी चार पथके नेमल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
आरोपी अमित आणि त्याची पत्नी भावना यांचे आठ वर्षांपूर्वीच लग्न झाले. ते मूळचे हरयाणा राज्यातील खरडालीपूर (जि. इसार) येथील रहिवासी आहेत. अमितला दारूचे व्यसन असल्यामुळे भावना त्याला सोडून ठाण्यातील कासारवडवली येथील जयवंत शिंदे चाळीत राहणारा नवऱ्याचा सख्खा लहान भाऊ (तिचा दीर) विकास धर्मवीर बागडी याच्यासोबत गेल्या सात वर्षांपासून मुलांसह राहत होती. अमित कधी तरी पत्नी आणि दोन्ही मुलांना भेटण्यासाठी ठाण्यात यायचा. तसाच तो तीन दिवसांपासून ठाण्यात आला होता. मुलांना भेटण्याच्या निमित्ताने तो भावाच्याच घरात मुले आणि पत्नीसोबत वास्तव्याला होता.
पती-पत्नींमध्ये वादअमितचा भाऊ विकास सकाळी घराबाहेर पडल्यानंतर पती आणि पत्नीमध्ये वाद झाल्याची दाट शक्यता आहे. पत्नी आपल्या भावाकडे वास्तव्याला असल्याची सल अमितच्या मनात होती. तर, पतीच्या दारूच्या व्यसनाला पत्नी त्रासली होती. यातूनच त्यांच्यात वाद होऊन त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता आहे. मात्र, हत्याकांडाचे नेमके कारण स्पष्ट नसल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले. तिघांचेही मृतदेह विच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
आरोपीच्या शोधासाठी चार पथके आरोपी अमित हा मूळचा हरयाणाचा असल्यामुळे बोरिवली, ठाणे येथील रेल्वेस्थानक त्याचबराेबर अन्यत्र शोधासाठी कासारवडवलीची दोन, चितळसरचे एक तसेच गुन्हे शाखेचे एक अशी चार पथके तैनात केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. बायकोचे आपल्या धाकट्या भावाबरोबर राहणे अमितला पटत नव्हते, त्यांच्यातील अनैतिक संबंधाचा त्याला संशय असण्याची तसेच अन्यही कारणातून ही हत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरोपीचा भाऊ विकास याच्यासह त्याच्या अन्य नातलगांकडेही चौकशी करण्यात येत आहे.
भावजयसह दोन मुले रक्ताच्या थाराेळ्यातनेहमीप्रमाणे त्याचा भाऊ विकास हा त्याच्या हाउस किपिंगच्या कामासाठी गुरुवारी (२१ डिसेंबर रोजी) सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला. सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास तो घरी परतला, तेव्हा त्याला घरात भावजय भावना तसेच दोन मुले रक्ताच्या थाराेळ्यात मृतावस्थेत आढळली. त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची लाकडी बॅट होती. त्याने ही माहिती तातडीने त्याचे घरमालक जयवंत शिंगे (५०) यांना दिली.
शिंगे यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर वागळे इस्टेट परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, कासारवडवलीचे पोलिस निरीक्षक शशिकांत रोकडे, सहायक पोलिस निरीक्षक सुहास हटेकर आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपीने त्याआधीच तिथून पळ काढला होता.