लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गावातील महिलेला जादूटोणा करून मारून टाकल्याचा आरोप करीत एका महिलेचे हात बांधून तिला स्मशानभूमीतून फिरवत चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना डाबचा कुकरखाडीपाडा, (ता. अक्कलकुवा) येथे सोमवारी घडली. याप्रकरणी तीन महिलांसह चौघांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये मोलगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुकरखाडीपाडा येथील मोकन्या खेमा वसावे यांची बहीण वज्याबाई बोख्या पाडवी या महिलेचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. वज्याबाई या महिलेला गावातीलच चमारीबाई होमा पाडवी (४०) या महिलेने जादूटोणा करून डाकीण बनून मारून टाकले असा समज मोकन्या वसावे व त्याच्या कुटुंबीयांनी करून घेतला. त्यामुळे मोकन्या याच्यासह हुवलाबाई मोकन्या वसावे, वंती खेमा वसावे, रायकीबाई दिवाल्या वसावे सर्व (रा. कुकरखाडीपाडा) यांनी चमारीबाई पाडवी यांना घरून ओढत आणून स्मशानात नेले. तेथे दोन्ही हात दोरीने बांधून स्मशानभूमीस फेरी मारायला लावली व शपथ घेण्यास भाग पाडले. चौघांनी तिला काठीने व दोरीने बेदम मारहाण केली. त्यांच्यापासून सुटका झाल्यानंतर चमारीबाई यांनी पोलीस ठाणे गाठले. तेथे आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपी फरार आहेत.
१० किमी चालत जाऊन कथन केली आपबितीnकुकरखाडीपाडा हे गाव अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम आणि जंगली भागात आहे. गावी जाण्यास रस्ता नसल्याने पायीच जावे लागते. पीडित महिलेची सुटका झाल्यानंतर ती घरी गेली. nतिने याबाबत घरच्या सदस्यांशी चर्चा केली. तोपर्यंत रात्र झाली होती. दुसऱ्या दिवशी कुकरखाडीपाडा येथून पायी १० किमी चालत पीडित महिला मोलगी पोलीस ठाण्यात दाखल झाली. nतिने पोलिसांसमोर आपबिती कथन केली. त्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलीस तपास करत आहेत.