सुपौल – बिहारच्या सुपौल जिल्ह्यात डबल मर्डरचं प्रकरण उघडकीस आल्यानं परिसरात खळबळ माजली आहे. याठिकाणी एका नगरसेविकेच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नगरसेविका माला देवी यांची मुले सासरी गेली होती. परंतु दुसऱ्या दिवशी दोघांचे मृतदेह कोसी नदीकिनारे सापडले. या घटनेला राजकीय पार्श्वभूमी असल्याचा संशय काहींनी व्यक्त केला आहे. परंतु नगरसेविका माला देवी यांनी जर पोलिसांनी योग्यप्रकारे तपास केल्यास हत्येचा खुलासा होऊ शकतो असं म्हटलं आहे.
नदीवर तरंगत होते दोन्ही मुलांचे मृतदेह
मधेपुरा वार्ड नंबर ८ च्या नगरसेविका माला देवींचा मोठा मुलगा मिठ्ठू याचं सासर सुपौलमधील डुमरिया येथे होते. मिठ्ठू त्याच्या भावासोबत रात्री उशीरा मधेपुराहून सासरवाडीला जाण्यासाठी निघाला होता. पूर्ण रात्र दोघं भाऊ घरच्यांच्या संपर्कात होते. परंतु बुधवारी सकाळी नगरसेविकेला काही लोकांनी फोन करत दोन युवकांचा मृतदेह कोसी नदीच्या पाण्यावर तरंगत असल्याची माहिती दिली.
नदीकिनारी सापडली सफेद रंगाची बाइक
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसही घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. त्याचसोबत सफेद रंगाची एक बाइकही जप्त केली. माला देवी म्हणाल्या की, माझा मुलगा त्याच्या दीड महिन्याच्या मुलाला कपडे देण्यासाठी सासरवाडीला गेला होता. संध्याकाळ झाली असल्याने त्याला जाण्यापासून रोखलं होतं. परंतु मुलाला पाहण्यासाठी तो भावाला सोबत घेऊन सासरी गेला. परंतु आता ते दोघंही कधीच त्यांच्या आईला भेटणार नाहीत असं सांगत माला देवी भावूक झाल्या.
पोलिसांनी तपासासाठी बनवलं पथक
नगरसेविकेच्या मुलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी डीएसपी इंद्र प्रकाश यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतरच या हत्याकांडामागे नेमके कोण आहे याचा खुलासा होऊ शकेल. सध्या पोलिसांनी संशयास्पद मृत्यू म्हणून प्रकरणाची नोंद केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. जेणेकरुन लवकरात लवकर या प्रकरणाचा उलगडा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.