हरियाणाच्या हिसार जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. याठिकाणी ५ लोकांच्या संशयास्पद मृत्यूनं अनेकांना धक्का बसला आहे. हिसार जिल्ह्यातील नंगथला गावात या घटनेने शांतता पसरली आहे. या ५ मृतदेहांबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत. नेमकं या हत्या आहेत की आत्महत्या याचा तपास करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.
रस्त्यावर पडला होता घरातील मुख्य व्यक्तीचा मृतदेह
नंगथला गावातील लोकांना रस्त्यावर जाताना गावातील रमेश कुमारचा मृतदेह आढळला तेव्हा अनेकजण थक्क झाले. त्यानंतर जेव्हा रमेश कुमारच्या घरी या घटनेची माहिती देण्यासाठी गावकऱ्यांनी जे दृश्य पाहिलं ते हैराण करणारे होते. या घरात राहणाऱ्यांचा सर्वांचा मृत्यू झाला होता आणि त्यांचे मृतदेह घरात पडले होते. गावकऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला कळवली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली. नेमकं घरातील इतक्या सदस्यांच्या मृत्यूमागे हत्या आहे की आत्महत्या? याचा पोलीस शोध घेत आहे. या हत्येमागे षडयंत्र तर नाही ना असाही पोलिसांना संशय येत आहे.
लग्नपत्रिका बनवण्याचं काम करायचा
नंगथला गावात राहणारा रमेश कुमार अग्रोहा येथे लग्नपत्रिका बनवण्याचं काम करत होता. मृतांमध्ये रमेश कुमार (३५), पत्नी सुनीता ,१५ व १३ वर्षीय दोन मुली आणि १० वर्षीय मुलाचा समावेश आहे.
५ संशयास्पद मृत्यूनं पोलिसांसमोर आव्हान
रमेशचा मृतदेह घराच्या बाहेर रस्त्यावर सापडला तर इतर सदस्यांचा मृतदेह घरात आढळून आले. त्यामुळे असाही अंदाज आहे की, रमेशनं सर्वात आधी कुटुंबातील सदस्यांना मारलं त्यानंतर स्वत:ने आत्महत्या केली आहे. परंतु याबद्दल कोणीही अधिकृत बोलण्यास तयार नाही. सध्या पोलीस या घटनेचा सर्व अँगलने तपास करत आहे. लवकरच या प्रकरणात खुलासा केला जाईल असं पोलिसांनी सांगितले आहे. परंतु नंगथला गावातील एकाच कुटुंबात ५ जणांच्या मृत्यूनं गावात शोककळा पसरली आहे. पोलीस मृतदेहाचं पोस्टमोर्टम करुन नातेवाईकांकडे मृतदेह सोपवणार आहेत.