ओडिशा येथील बलांगिरी जिल्ह्यात एक धक्कादायक उघडकीस आली आहे. एका घरातून एकाच कुटुंबातील ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये ४ मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान ह्या हत्या आहेत की आत्महत्या हे अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाही आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पटणागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सानरापाडा गावात बुलू जानी (५०), त्यांची पत्नी ज्योती (४८) आणि त्यांची दोन मुलं आणि दोन मुली यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मुलांचे वय दोन ते 12 वर्षेदरम्यान असल्याचे समजत आहे. ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत हे मृतदेह आढळून आले आहेत. मृतदेह आढळताच शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहचली.
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलू गेली दहा वर्षे आजूबाजूच्या गावात मध विकायचा आणि पोट भरायचा. पटणागड पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा खून की आत्महत्या हे अद्याप समजू शकलेला नाही आहे. ते म्हणाले की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. संपूर्ण घराची तपासणी केली गेली आहे. जेणेकरून घटनेसंबंधी धागेदोरे हाती लागतील. तसेच बलांगिरीचे पोलीस अधीक्षक संदीप संपत यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात सहा मृतदेहांवर शस्त्राचे व्रण दिसून आले असून तपास सुरु आहे.