लखनऊ : उत्तर प्रदेशात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर अयोध्येत आणखी एका साधूची संशयास्पद मृत्यूची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अयोध्येतील एका मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने या साधूचा मृत्यू झाला आहे. मृत साधूचे नाव मणिराम दास असं आहे. दास यांनी आत्महत्या केली की कोणी ढकललं बाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पोलिसांनी दास यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मृत साधू हे गेल्या अनेक दिवसांपासून तणावाखाली होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, त्यामागे नेमके कारण काय होते? हे समजू शकलेलं नाही. पोलीस सध्या मंदिर प्रशासन आणि इतर साधूंकडून माहिती घेत आहेत. याशिवाय पोलीस दास यांचे फोन रेकॉर्डही तपासून पाहत आहेत. त्याप्रमाणे या घटनेमुळे अयोध्येतील साधू, महंतांमध्ये दुःखद वातावरण आहे. मणिराम गेल्या काही दिवसांपासून खूप कमी बोलत होते. याशिवाय हल्ली त्यांना एकटं राहणं आवडत होते. याआधी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महंत गिरी यांच्या आत्महत्येची घटना समोर आली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली होती. त्यामध्ये त्यांनी आपले शिष्य आनंद गिरी, आध्या तिवारी आणि संदीर तिवारी यांच्यावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी तीनही जणांना अटक केली आहे.