बंगळुरू - कर्नाटकची राजधानी बंगळुरूतून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी चौथ्या मजल्यावरून पडून एअर होस्टेसचा मृत्यू झाला. एअर होस्टेस ही तिच्या बॉयफ्रेंडच्या घरी होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. सध्या युवतीच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. बॉयफ्रेंडनं एअर होस्टेसची हत्या केल्याचा संशय आहे त्यामुळे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.
२८ वर्षीय एअर होस्टेस अर्चना धीमान काही दिवसांपूर्वी डेटिंग APP द्वारे इंजिनिअर आदिशला भेटली. हळूहळू दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. परंतु काही दिवसांत भांडण झाले. दोघांच्या नात्यात वितुष्ट आले. त्यानंतर अर्चनाने दुबईहून बंगळुरू गाठत नाते संपवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांच्या माहितीनुसार जेव्हा अर्चना बॉयफ्रेंड आदिशला भेटण्यासाठी त्याच्या फ्लॅटवर पोहचली. तेव्हा तिचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. अर्चनाच्या मृत्यूनंतर आदिशने पोलिसांना सूचना दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. परंतु तपासानंतर ही हत्याचा असल्याचा संशय आला. अर्चना धीमान ही हिमाचलच्या धर्मशाळा इथं राहणारी होती तर आदिश केरळला राहायचा. दोघांमध्ये डेटिंग App वरून बोलणे झाले. सुरुवातीला आदिशने पोलिसांना सांगितले की, दोघांमध्ये भांडण झाले त्यानंतर अर्चनाचा खाली पडून मृत्यू झाला मात्र ही हत्या असावी असं वाटल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासात गती आणली आहे.
दरम्यान, अर्चना बंगळुरूमध्ये एअर होस्टेस होती. त्यानंतर इंटरनॅशनल कंपनीत ती एअर होस्टेस म्हणून कामाला लागली. त्यानंतर आदिश आणि दोघांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात मग त्यानंतर झालेल्या भांडणातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अर्चना आदिशच्या फ्लॅटवर गेली होती. ज्या जागेवरून अर्चनाचा पडून मृत्यू झाला तेथून उडी मारणे सोप्पे नाही. त्यामुळे पोलिसांनी आदिशला ताब्यात घेतले आहे. चौकशीत दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्याने मान्य केले. तसेच भांडण झाल्याचेही कबुल केले.