नंदूरबार - जिल्ह्यातील धडगाव येथील ईश्वर वळवी या ऊसतोड कामगाराचा सोलापूर जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांना धक्का बसला आहे. ईश्वर वळवी हे माळशिरस तालुक्यातील तोंडले गावात ऊसतोडीसाठी गेले होते. त्याठिकाणी वळवी यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना देण्यात आली. त्यावरून कुटुंबीयांनी मुकादम आट्या वळवी, तोंडलेतील रवी चव्हाण, मनोज चव्हाण यांची सखोल चौकशी करून गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली आहे.
या प्रकरणाबाबत मृत ईश्वर वळवीचा लहान भाऊ सागर वळवी म्हणाला की, मुकादमानं २ तुकडी गावात आहेत असं सांगून नेले. परंतु प्रत्यक्षात केवळ ५-६ जण कामाच्या ठिकाणी होते. तेव्हा ईश्वरनं ठेकेदार आणि मुकादमांना आणखी काही माणसे लागतील असं सांगितले. तेव्हा मुकादमांनी जितके आहेत तितक्यांनी ऊसतोड करा असं सांगितले. त्यावरून वाद झाला त्यात ईश्वरला मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतर दहशत निर्माण झाली. ४ नोव्हेंबरला ईश्वर गावाकडे परत निघाला तेव्हा त्याने वडिलांना फोन केला होता. मला मारहाण होत असून माझ्या जीवाला धोका आहे असं म्हटलं होते.
त्यानंतर भावाचा फोन कट झाला. आम्ही ५ तारखेला मनमाड येथे निघण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात मनमाड पोलिसांचा आम्हाला फोन आला. एक मृतदेह सापडलाय. तो व्यक्ती तुमच्या घरचाच आहे का हे ओळख पटवण्यासाठी व्हॉट्सअपवर फोटो पाठवला. हा फोटो बघितल्यानंतर तो ईश्वरच होता हे दिसले. आदल्यादिवशी ईश्वरचं फोन आला आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या मृत्यूची बातमी समजल्याने आम्हाला धक्का बसला. त्यामुळे जे माझ्या भावाला घेऊन गेले होते. ज्यांनी मारहाण केली त्यांनीच माझ्या भावाला मारलं असा आरोप मृत व्यक्तीचा भाऊ सागर वळवीनं केले आहे.
मृतदेह मिठात पुरुन ठेवलापोलिसांच्या सांगण्यानुसार कुटुंबाने मनमाड गाठत त्याठिकाणाहून ईश्वरचं प्रेत आणलं. त्याच्या मृतदेहावर अनेक जखमा असल्याचं नातेवाईकांनी म्हटलं. ही आत्महत्या नसून त्याला मारहाणीनंतर गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मात्र कुटुंबीयांनी मृत ईश्वर वळवीवर अंत्यविधी न करता त्याचे प्रेत मिठात पुरून ठेवले आहे. जोपर्यंत आरोपींना शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.