नागपूर - गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी बेदम मारहाण केल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याच्या आरोपाने जुना बगडगंज परिसरात तणाव निर्माण झाला आहे. बॉबी उर्फ वंशिल हर्षवर्धन डोईफोडे असे मृत बालकाचे नाव आहे.
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना बगडगंज भागात राहणारा वंशिल तेजस्विनी शाळेत ६ व्या वर्गात शिकत होता. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास त्याची प्रकृती बिघडली. त्याला इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बगडगंज भागात तणाव निर्माण झाला. उलटसुलट चर्चेला उधाण आले. वंशिलला तीन चार दिवसांपूर्वी वस्तीतील दोन गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी बेदम मारहाण केली होती. घरी कुणाला काही सांगायचे नाही, अशी धमकीही दिली होती. त्यामुळे वंशिलने घरच्यांना काही सांगतिले नाही. मात्र, ताप आणि सर्वांग दुखत असल्याने घरच्यांनी त्याला डॉक्टरकडे नेले. उपचारानंतर त्याला घरी आणण्यात आले. शनिवारी रात्री त्याची प्रकृती पुन्हा खालावली आणि रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच नंदनवन पोलिसांनी वंशिलच्या कुटुंबियांकडे चाैकशी केली. वंशिलच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ जखम दिसल्याने मारहाणीचा संशय अधिक गडद झाला आहे. ‘त्या’ दोघांच्या मारहाणीमुळेच वंशिलचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा
वंशिलचा मृत्यू नेमका कसा झाला, त्या जखमा कशामुळे झाल्या, त्याची चाैकशी केली जात आहे. वैद्यकीय अहवालातून पुढच्या कारवाईचे स्वरूप ठरविले जाईल, अशी माहिती ठाणेदार किशोर नगराळे यांनी या संबंधाने ‘लोकमत’ला दिली.