नाशिक : पराकोटीला गेलेला कौटुंबिक कलह अन् त्यातून वारंवार उडणारे खटके व वादविवादामुळे मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा त्यांच्या पतीनेच पूर्वनियोजित कट रचून थंड डोक्याने काटा काढला. वाजे ‘मर्डर मिस्ट्री’चा पर्दाफाश करण्यास ग्रामीण पोलिसांनी यश मिळविले. गुरुवारी वाडीवऱ्हे पोलिसांनी संशयित वाजे यास बेड्या ठोकल्या.
सिडको येथील मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत डॉ. सुवर्णा संदीप वाजे (३८) या दि. २५ जानेवारीच्या रात्रीपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या पतीने याबाबत मध्यरात्री धाव घेत अंबड पाेलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. मात्र, त्याच रात्री महामार्गालगत रायगडनगरजवळ वाजे यांची मोटार जळालेल्या अवस्थेत आढळली होती. तसेच कारमध्ये काही मानवी हाडेदेखील सापडल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला.
जळालेली हाडे नेमकी कोणाची? याचा उलगडा पोलिसांना होत नव्हता. ती हाडे वाजे यांचीच असल्याचा डीएनए अहवालातून आल्यानंतर वाजे यांच्या माहेरच्या नातेवाईकांच्या जाबजबाबावरून पोलिसांनी संशयित त्यांचे पती संदीप यांना अखेर गुरुवारी बेड्या ठोकल्या. त्यास शुक्रवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. त्याच्यासह अन्य पाच संशयित साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा नाशिक ग्रामीणच्या वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. उर्वरित साथीदारांचा शोध घेतला जात असल्याचे अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.