सदानंद नाईक
उल्हासनगर : ओमी कलानी टीमचे माजी कार्याध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे संतोष पांडे यांना रविवारी रात्री कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने एका अपहरण व खंडणीच्या गुन्ह्या प्रकरणी अटक केली. याच गुन्ह्यात ओमी कलानी व कमलेश निकम संशयीत आरोपी असल्याने अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर उभी ठाकली आहे.
उल्हासनगर राष्ट्रवादीचे नेते तसेच पूर्वीचे ओमी कलानी टीमचे प्रमुख ओमी कलानी यांच्यासह कट्टर समर्थक कमलेश निकम, संतोष पांडे, सन्नि तेलकर, रुपेश चव्हाण, विजय शिंदे, हरदीप कमलदीप सिंग, गुड्डू राय यांच्यासह अहमदाबाद येथील ३ जनावर, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ४ डिसेंबर २०१८ रोजी अनिल कंजानी यांचे अपहरण करून ५० लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यापैकी सन्नि तेलकर, रुपेश चव्हाण, विजय शिंदे, हरदीप कमलदीप सिंग व गुड्डू राय यांना यापूर्वीच अटक झाली होती. तर रविवारी रात्री संतोष पांडे याला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. पांडे हे राष्ट्रवादी पक्षाचे नेते ओमी कलानी यांचे कट्टर समर्थक आहेत. ते ओमी कलानी टीमचे माजी कार्याध्यक्ष राहिले आहे.
अनिल कंजानी अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यात ओमी कलानी व कमलेश निकम हे संशयित आरोपी आहेत. तपासात काही निष्पन्न झाल्यास ओमी कलानी, कमलेश निकम यांच्यासह अहमदाबाद येथील ३ जणांना अटक होण्याचे संकेत पोलीस सूत्रांनी दिले. याप्रकारने कलानी समर्थकात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीना पक्षात महत्वाची पदे देणार का? असा प्रश्न निर्माण झाला. गेल्या पाच वर्षापूर्वी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने ओमी कलानी टीम सोबत महाआघाडी करण्यापूर्वी ओमी कलानी यांच्यावर असलेले गंभीर गुन्हे मागे घेण्याची खेळी खेळली होती. पांडे यांच्या अटकेची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर पाटील व सहायक पोलिस निरीक्षक भूषण दायमा यांनी दिली असून २७ डिसेंबर पर्यंत पांडे याला न्यायालयीन कस्टडी मिळाली आहे.
आमदार आयलानी हे गुन्हेगारीचा प्रश्न उचलणार?
गेल्या आठवड्यात भाजप आमदार कुमार आयलानी, भाजप शहाराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पप्पु कलानी यांचा पेरॉल व शहरातील गुन्हेगारी बाबत थेट विधानसभेत प्रश्न उचलणार असल्याचे सांगितले होते. आयलानी येणाऱ्या विधानसभा सत्रात गुन्हेगारी बाबत खरोखर प्रश्न उचलणार का? अशी चर्चा शहरात रंगली आहे.