नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनासर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडूनही दिलासा मिळालेला नाही. चिदंबरम यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश रंजन गोगोई शुक्रवारी सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. काल आणि आज सकाळी सीबीआयचे पथक चेन्नई येथील चिदंबरम यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र, चिदंबरम नसल्याने रिकाम्या हाती पथकास परतावे लागले होते. तसेच ईडीनेही चिदंबरम यांना नव्याने लुकआऊट नोटीस जारी करून त्यांना भारताबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे देशाबाहेर जाण्यासाठी त्यांना ईडीची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.
दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडूनही तूर्तास दिलासा मिळू शकला नाही. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात न्या. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. हे प्रकरण त्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवले होते असून गोगोई यांनी या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे चिदंबरम यांच्या समोरच्या अडचणी वाढल्या आहेत.
ईडीने चिदंबरम यांच्याविरोधात काढलेली लुकआऊट नोटीस रस्ते परिवहन, हवाई दल आणि नौदलाला पाठवली आहे. त्यात चिदंबरम यांना ईडीच्या परवानगी शिवाय भारताबाहेर जाण्याची परवानगी न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काल सायंकाळपासून चिदंबरम यांचा कुठेच पत्ता लागत नाही. त्यामुळे ईडीने चिदंबरम यांचा शोध सुरू ठेवला आहे. धक्कादायक म्हणजे चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी आयएनएक्स घोटाळ्यात मिळालेल्या लाचेच्या रकमेतून स्पेनमध्ये एक टेनिस क्लब आणि अमेरिकेत बंगला खरेदी केला आहे. त्याशिवाय कार्तीने देश-विदेशात अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी केली. याप्रकरणी चिदंबरम यांना ताब्यात घेऊन ईडीला त्यांची चौकशी करायची आहे.