नागपूर - वैवाहिक जीवनात वितुष्ट आल्याने एकाकी पडलेल्या एका महिला डॉक्टरने विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. जरीपटक्यात गुरुवारी रात्री ही घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी या घटनेचा उलगडा झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. आकांक्षा अमृत मेश्राम (वय ३४) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. सुखवस्तू कुटुंबातील आकांक्षाचे वडील निवृत्तीचे जीवन जगतात. आई एलआयसीत असून भाऊ बेंगळुरूमध्ये नोकरी करतो.
एमबीबीएस, एमडी केल्यानंतर २०१६ मध्ये आकांक्षाचे लग्न झाले होते. त्या सोलापुरात सरकारी रुग्णालयात नोकरी करायच्या. सर्व काही व्यवस्थित होते. मात्र, वैवाहिक जीवनात कटुता आल्याने आकांक्षा आणि त्यांच्या पतीने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कोरोनाची पहिली लाट आली. त्यामुळे आकांक्षा नागपुरात परतल्या. जरीपटक्याच्या नागसेन नगरातील वडिलांच्या निवासस्थानी वरच्या माळ्यावर त्या राहू लागल्या. खाली आईवडील राहात होते. गुरुवारी रात्री ९ वाजले तरी त्यांची हालचाल ऐकू येत नसल्याने आईवडीलांनी त्यांची रूम गाठली असता त्या बेडवर बेशुद्धावस्थेत आढळल्या. बाजूलाच चार ते पाच सिरिंज पडल्या होत्या. त्यातील दोन रिकाम्या आढळल्या. आईवडिलांनी लगेच डॉक्टरला बोलविले. तपासल्यानंतर डॉक्टरांनी आकांक्षा यांना मृत घोषित केले. दरम्यान, माहिती कळताच जरीपटक्याचे ठाणेदार वैभव जाधव, पीएसआय नाईकवाडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. मृतदेह ईस्पितळात रवाना करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, वैद्यकीय अहवालानंतर गुन्ह्याचे स्वरूप ठरविले जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
सुसाईड नोटमध्ये व्यथा
वैवाहिक जीवन संपुष्टात आल्यानंतर आकांक्षा कमालीच्या एकाकी पडल्यासारख्या झाल्या होत्या. अलिकडे त्या नैराश्याने घेरल्यासारख्या वागत होत्या. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक भावनिक सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात त्यांनी आपली व्यथा मांडतानाच आता कोणताच डॉक्टर माझा उपचार करू शकत नाही, असे लिहून ठेवल्याचे समजते. आत्महत्येसाठी कुणाला जबाबदार धरू नका, असेही त्यांनी चिठ्ठीत नमूद केल्याचे समजते.