मुंबई - सायन कोळीवाडा परिसरातील म्हाडा कॉलनीत 7 डिसेंबरला भरदुपारी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी मारीमुथू पेरियास्वामी देवेंद्र उर्फ टी. पी. राजा (वय ४०) याची हत्या करून पसार झालेल्या एका आरोपीला पकडण्यात वडाळा टी. टी. पोलिसांना यश आले. अमजद मकबूल खान (वय 31) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो राजस्थानात सापडला. अटक आरोपीचा दुसरा साथीदार इम्रान याचा पोलीस शोध घेत आहेत.
वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या म्हाडा कॉलनीतल्या ‘सूर्यनिवास’ या इमारत क्रमांक 3 मध्ये चौथ्या मजल्यावर भाडय़ाने घेतलेल्या घरात कुख्यात गुंड डी. के. रावच्या हस्तक टी. के. राजा राहत होता. हत्या झाली त्या दिवशी टी. के. राजा घरात एकटाच असताना दुपारी तीनच्या सुमारास दोन अज्ञात इसम त्याच्या घरात घुसले आणि त्यांनी राजाचा गळा सुऱ्याने चिरून त्याच्या डोक्यात एक गोळी मारली. त्यावेळी आरोपी आणि राजामध्ये झटापटदेखील झाली. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. आरोपींचे कपडे रक्ताने माखलेले होते. ते पळत इमारतीखाली आल्याने रहिवाशांमध्ये खळबळ उडली. दरम्यान, आरोपींची मोटारसायकल सुरू न झाल्यामुळे दुचाकी तेथेच सोडून मारेकरी पळतच परिसरातून निसटले. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच खबऱ्यांना कामाला लावले. त्यामुळे राजाची हत्या करणारे इम्रान आणि अमजद खान हे दोघे असल्याचे निष्पन्न झाले. तपासात अमजद राजस्थानमध्ये असल्याची पक्की खबर मिळताच वडाळा टी. टी. पोलिसांच्या एका पथकाने तेथे जाऊन अमजदला अटक केली आहे.
कुख्यात गुंड डी. के. रावच्या हस्तकाची हत्या; बाईक सुरु होत नसल्याने आरोपी सुटले पळत