सांगली: विवाहित महिलेच्या ओळखीचा फायदा घेऊन पाणी पिण्याचा बहाणा करीत तिच्या घरात जाऊन बलात्कार केल्याप्रकरणी तरुणाविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन गौतम माने (वय ३०, रा. बामणोली, ता. मिरज) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित सचिन माने याची पीडित महिलेच्या कुटुंबाशी ओळख आहे. ओळखीचा फायदा घेत शुक्रवारी तो पाणी पिण्याच्या बहाण्याने पीडित महिलेच्या घरी गेला. घरी कोणी नसल्याचे पाहून संबंधित महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर ‘कोणास काही सांगितलेस तर तुला जिवंत ठेवणार नाही.’ अशी धमकी देऊन तो पसार झाला. पीडित महिलेने संशयिताविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा कुपवाड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित माने याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, इस्लामपूरमध्येही एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिच्याशी लग्न करून बालविवाह कायद्याचे उल्लंघन केल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील खासगी रुग्णालयात संबंधित विवाहिता प्रसूतीसाठी दाखल झाल्यावर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबासाहेब रावसाहेब मंडले (रा. मुडशिंगे, ता. हातकणंगले) याच्याविरुद्ध पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. एस. एस. जोशी यांनी घटनेची वर्दी दिली आहे. संबंधित विवाहिता गर्भवती असल्याने तिला शहरातील खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. तिचे आधार कार्ड पाहिल्यावर ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले; मात्र तिची प्रकृती गंभीर बनत चालल्याने मानवी भूमिकेतून डॉ. जोशी यांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. यात या अल्पवयीन मुलीने स्त्री अर्भकाला जन्म दिला. बाबासाहेब मंडले याने अल्पवयीन मुलीशी विवाह करून बालविवाह कायद्याचा भंग केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.