सोलापूर : भाजी खरेदीसाठी मंडईकडे निघालेल्या पादचा-याला दोन अनोळखी व्यक्तींनी अडवून आम्ही सरकारी अधिकारी आहोत.. सध्या गंडवणारे लोक फिरत आहेत, असे सांगून गळ्यातील दागिने कोणीतरी हिसकावून नेतील. काढून द्या, पुडीत बांधून देतो म्हणत सोन्याची चेन घेऊन दोन पितळी अंगठ्या देऊन ५० हजार गंडवल्याचा प्रकार बार्शी शहरात अलीपुरा रस्त्यावर घडली.
ही घटना शनिवारी ६ मे रोजी भरदुपारी घडली. याबाबत हनुमंत जनार्धन दळवे (वय ६१, रा.अलीपूर रोड, माऊली चौक, बार्शी) यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी दोन अनोळीखींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी हनुमंत दळवे हे राज्य परिवहन महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. भाजी आणायला ते मंडईत चालत निघाले होते. त्यांना दोन अनोळखी व्यक्तींनी अडवले.
सध्या गंडवणारे लोक फिरत असून गोड बोलून दागिने हिसकावून नेतील अशी त्यांना भीती घातली. त्यानंतर गळ्यातील चेन काढून द्या म्हणताच दळवे यांनी विश्वासाने दहा ग्रॅम सोन्याची चेन काढून दिली. त्यावेळी त्यांची दिशाभूल करून आरोपींनी सोन्याची चैन ऐवजी जवळच्या दोन पितळी आंगठया कागदाच्या पुडीत बांधून देऊन हातचालाखी केली. त्यानंतर ते तेथून पसार झाले. पुढील तपास पोलीस नायक सुनील भांगे करत आहेत.